सेंद्रिय शेती कार्यक्रमात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:21+5:302021-05-28T04:25:21+5:30
अंबाजोगाई : वाढता उत्पादन खर्च व असुरक्षित शेतमाल बाजार या प्रमुख शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी बीड जिह्यातील चार तालुक्यांतील ...
अंबाजोगाई : वाढता उत्पादन खर्च व असुरक्षित शेतमाल बाजार या प्रमुख शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी बीड जिह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रिय शेती कार्यक्रम मानवलोकमार्फत राबवण्यात येत आहे. ज्यात खात्रीशीर दर व खरेदीची व्यवस्था आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी केले आहे.
अस्मानी असो की सुलतानी, शेतीच्या वाटेला संकटे पुजलेली आहेतच. यातून मार्ग काढत पिकेल ते विकणार का? याची चिंता करण्यापेक्षा खात्रीची विक्री व्यवस्था, त्यात अधिकचे दोन पैसे सतत कसे मिळतील हे आपण शेतकऱ्यांनी पाहायला हवे. वैयक्तिक एकटा शेतकरी हे करू शकणार नाही, मात्र एकत्र येत आपण नक्कीच हे साध्य करू शकतो. यासाठी मानवलोकने या स्वरूपाचा विशेष ‘सेंद्रिय शेती कार्यक्रम’ या भागातील शेतकऱ्यांसाठी आखला आहे.
मानवलोकच्या मार्गदर्शनात कार्यरत शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत आपल्या सेंद्रिय शेतमालाच्या खरेदीची खात्री करण्यात येत आहे. त्याचा दर कायम प्रचलित शेती उत्पादनापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, माहिती, एनपीओपी मान्यताप्राप्त अधिकृत निविष्ठा यासुद्धा मानवलोक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. खरिपात आपण घेत असलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी ही पिके यात घ्यायची आहेत. त्यामुळे दर, तंत्रज्ञान, मार्केट यासारखे सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस या कार्यक्रमातून आहे, असे अनिकेत लोहिया यांनी बोलून दाखवले.
हा कार्यक्रम अंबाजोगाई, केज, धारूर, परळी वैजनाथ तालुक्यातील गावांसाठी आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मानवलोकच्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी केले आहे. यात सहभागी होण्यासाठी आपण मानवलोक कार्यकर्त्यांना संपर्क साधावा, असे अवाहन मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी केले आहे.