यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:45 PM2024-07-31T19:45:58+5:302024-07-31T19:46:19+5:30
आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन
- नितीन कांबळे
कडा (बीड) : आपला परिसर हा दुष्काळी आहे. शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे शेतकरी, गोरगरीब कुटुंबातील आहेत, आई-वडिलांचे नावलौकिक करण्यासाठी शेतकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करावी. यूपीएससी पास होऊन यावे अन् संस्थेच्यावतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी कडा येथे संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केले.
कडा येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक पांडुरंग धोंडे यांचा सेवापुर्ती सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षपदावरून मा. आ. भीमराव धोंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अजय धोंडे, जेष्ठ नेते विठ्ठलराव बनसोडे, चेअरमन राजेश धोंडे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, दिलीप काळे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब गिर्हे, प्रा. बाळासाहेब धोंडे, प्रा. संजय धोंडे व इतर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कमी पडतात. मी यापूर्वीही जाहीर केले होते की, यूपीएससी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, परंतु ते कोणीही जिंकले नाही. आता परत आवाहन करतो की, संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यूपीएससी पास व्हावे अन् ११ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे. भविष्यात काय व्हायचे ते आत्ताच ठरवा, असेही माजी आमदार धोंडे म्हणाले.
याप्रसंगी मुख्याध्यापक सिद्धेश्वर शेंडगे, प्रा. राम बोडखे, प्रा . श्रीकांत धोंडे, प्रा. कांचन गोरे, निलेश गोरे, प्रा. मंगल झगडे यांची भाषणे झाली.प्रास्ताविक प्राचार्य महादेव दानवे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. दत्तात्रय ढवळे यांनी केले,उपस्थितांचे आभार प्रा. संजय धोंडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षकांसह पांडुरंग धोंडे यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.