‘संचारबंदी’मुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी ! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:30+5:302021-04-16T04:33:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. त्यामुळे एकवेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत होत असल्याचे चित्र आहे. मात्र, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ हजार गरजूंना जेवण मिळणार आहे. मात्र, प्रशासनाने वेळोवेळी तपासणी करून शिवभोजन केंद्रांवर लक्ष देण्याचीही गरज आहे.
शासनाकडून गर्दीच्या ठिकाणी जसे बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, रुग्णालय, मोंढा, बाजार समिती यासह इतर ठिकाणी शिवभोजन केंद्राची स्थापना केली आहे. यापैकी बीड शहरातील ७ ठिकाणी व इतर तालुक्यात १७ ठिकाणी अशी २४ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या २४ शिवभोजन केंद्रांवरून २ हजार जणांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार संचारबंदी काळात मोफत शिवभोजन थाळी दिली जाणार आहे. यामध्ये घरपोच व केंद्रावर वाटप करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे. या शिवभोजन थाळी केंद्रचालकांवर लक्ष ठेवण्याचे काम संबंधित तहसीलदारांचे आहे. तसे पत्रदेखील पुरवठा विभागाकडून पाठविण्यात आले आहे.
बोगस लाभार्थी दाखवले जातात
शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून बीड शहरात बोगस लाभार्थी दाखवल्याचे समोर आले होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीचा लाभ गरजूंना मिळावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र २४
दररोज लाभ घेणाऱ्यांची संख्या १,५००
तपासणी करणे गरजेचे
शिवभोजन केंद्रांकडून दिल्या जाणाऱ्या थाळीचा लाभ किती जणांना दिला जातो, याचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवले जाते. मात्र, यापैकी काही लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. यामुळे संबंधित तहसील विभागाने या केंद्रांची वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे.
काही थाळींमध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दिले जात नाहीत. निकृष्ट अन्नधान्य वापरले जाते, अशा तक्रारीही काही लाभार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात हातचे काम गेल्यामुळे शिवभोजन थाळीचा आधार वाटत आहे. मात्र, जेवणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. डाळ म्हणून फक्त पिवळे पाणी दिले जाते.
- बबन कांबळे, लाभार्थी
शिवभोजन थाळी घरपोच मिळत आहे. मात्र, हाताला काम असेल तर इतर गरजादेखील भागवता येतात. लवकरात लवकर सर्वकाही सुरळीत करावे.
- भोलेनाथ जगताप, लाभार्थी
===Photopath===
140421\375314_2_bed_18_14042021_14.jpg
===Caption===
बीड शहरातील शिवभोजन थाळीचा लाभ घेताना