चालकाच्या जागेवर ठाण मांडत प्रवाशाने रेल्वेगाडी धरली वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 04:46 PM2019-06-26T16:46:19+5:302019-06-26T16:47:21+5:30
प्रवासी मुंबईचा असल्याचे सांगण्यात आले.
परळी (जि.बीड) : येथील रेल्वे स्थानकात थांबलेल्या परळी -अकोला रेल्वे गाडीच्या इंजिन चालकाच्या जागेवर ठाण मांडत एका प्रवाशाने गाडीच वेठीस धरली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. त्याला सजग प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे ही गाडी परळी स्थानकातून २५ मिनिटे उशिराने धावली.
येथील रेल्वे स्थानकावर परळी- अकोला रेल्वे आल्यानंतर ती निघण्याच्या वेळेत एका प्रवाशाने लोको पायलटच्या जागी ठाण मांडले. हा प्रकार काही प्रवासी, लोको पायलट (इंजिन चालक)आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सावधगिरी बाळगत त्याला खाली उतरण्यास सांगण्यात आले. परंतू तो प्रतिसाद देत नव्हता. अखेर प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी इंजिनमधून त्यास बळजबरीने बाहेर काढले. नंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार घडल्याने दुपारी १.१५ वाजता निघणारी परळी-अकोला रेल्वे गाडी २५ मिनिटे उशिरा धावली. लोको पायलटच्या जागेवर बसलेल्याची चौकशी केली असता तो प्रवासी मुंबईचा असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या हातात पाण्याची बाटली होती. अंगात टी शर्ट, पॅन्ट , डोळ्यांवर चष्मा होता. या प्रकाराची परळी रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस ठाण्यात मात्र नोंद झाली नाही.