प्रवासी तरुण पडला बेशुद्ध चालकाने बस आणली थेट रुग्णालयात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 03:23 PM2019-09-17T15:23:11+5:302019-09-17T15:25:01+5:30
तरुणाला अचानक चक्कर आली व तो सिटवरच बेशुद्ध पडला.
बीड : एस.टी.बसमधून प्रवास करत असतांनाच बीडनजीक बस आलेली असतांना एका तरुण प्रवाशाला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. हा प्रकार लक्षात येताच चालक आणि वाहकाने समय सुचकता दाखवत बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत त्या तरुणाला उपचार मिळवून दिले.
झाले असे की, परळी-पाटोदा ही राज्य परिवहन महांडळाची बस क्र. (एम एच 20 बी एल 0807) आज मंगळवारी (दि.17) सकाळी परळी येथून प्रवाशांना घेवून पाटोद्याकडे निघाली होती. दिंद्रुड येथून आत्माराम व्हरकटे (25, रा.व्हरकटवाडी, ता.धारुर) हा तरुण पुढील प्रवासासाठी बसमध्ये बसला होता. सकाळी बस बीड नजीक आलेली असतांना त्या तरुणाला अचानक चक्कर आली व तो सिटवरच बेशुद्ध पडला.
बसमधील प्रवाशी तसेच चालक-वाहकाच्या हा प्रकार लक्षात येताच बार्शी रोडवरुन बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आली. तातडीने तरुणाला खाली उतरवत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर डॉक्टर मनोज घडसिंग व त्यांच्या टीमने उपचार केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तो तरुण रुग्णालयातून बाहेर पडला. मात्र प्रवाशी बेशुद्ध पडताच त्याला उपचार मिळवून देण्यासाठी चालक-वाहकांनी दाखवलेल्या समय सुचकतेचे रुग्णालयातील कर्मचार्यांसह नागरिकांकडून कौतुक झाले.