प्रवाशांनो तिकीट सांभाळून ठेवा, नसता मोजावे लागेल दुप्पट भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:40 AM2021-09-24T04:40:06+5:302021-09-24T04:40:06+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान राज्यभरात प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तपासणी मोहीम राबविताना मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी गणवेशात असणार आहेत. आगारातील पर्यवेक्षकांना स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोहीम राबविताना बसस्थानकावर आलेल्या बीड व इतर विभागांच्या सर्व बसेसची तपासणी हे पथक करत आहे.
...अशी होईल दंडात्मक कारवाई
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत, मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने दिलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम रुपये शंभर यापैकी जी अधिक असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे.
तीन हजार बस तपासल्या, १०५ जणांवर कारवाई
रापमच्या वतीने राज्यात ही मोहीम सुरू होण्याआधी बीड विभागात चालविलेल्या मोहिमेत ३ हजार १२५ बसेस तपासण्यात आल्या. दिवसाकाठी शंभर बसेसची तपासणी झाली. यात १०७ प्रकरणे आढळली. कमी भाडे, गहाळ तिकीट, विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून चुकवलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली. एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितले.
...अशी होणार तपासणी
प्रवास भाडे वसूल करून प्रवाशांना योग्य तिकीट दिले दिले जाते का? विनातिकीट कोणी प्रवास करतोय का? तिकिटांची पुनर्विक्री होते का? तपासरीदरम्यान वाहकाकडे राज्य परिवहन महामंडळाची रक्कम कमी अथवा जास्त आढळते का? याची ग्रामीण लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस, तसेच आंतरराज्य बसेसची तपासणी होणार आहे.
तिकीट सांभाळणे हिताचेच
प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्याकडील तिकीट सांभाळून ठेवणे महत्त्वाचे आहे. गुंतागुंत निर्माण झालेल्या प्रकरणात तिकीट काढल्याचा व प्रवास केल्याचा पुरावा उपलब्ध होऊ शकतो, तसेच अपघात किंवा आपत्तीच्या प्रसंगात संबंधित प्रवासी हा रापमच्या बसमधून प्रवास करीत होता, हे काढलेल्या तिकिटाच्या आधारे सिद्ध करता येऊ शकते.