पाटोद्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:25 PM2018-03-18T23:25:21+5:302018-03-18T23:25:21+5:30
पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयात नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. दुपारी वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र नातेवाईकांना दिल्यानंतर तणाव निवळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येथील ग्रामीण रूग्णालयात नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. दुपारी वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र नातेवाईकांना दिल्यानंतर तणाव निवळला.
नानाभाऊ जगन्नाथ लऊळ (५५) असे उपचाराअभावी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेती आणि मुकादम असा त्यांचा व्यवसाय होता. रविवारी सकाळी त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने येथील खाजगी रूग्णालयात दाखवले. तेथून सरकारी रूग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला गेला. त्यावरून त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात त्यावेळी केवळ एक परिचरिका आणि शिपाई उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी नसल्याने नानाभाऊ यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शहरामध्ये निधनाची माहिती वाºयासारखी पसरली. लऊळ आणि त्यांच्या नातेवाईक आप्तेष्टांनी उपचारांअभावी नानाभाऊ यांचे निधन झाल्याने संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक चव्हाण, सपोनि संजय सहाने, जालिंदर शेळके, जामदार तांदळे, सुभाष मोटे, कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ऐन पाडव्याच्या दिवशी लऊळ यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तातडीची कारवाई : अधीक्षकांची धाव
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार करण्यात आली. दुपारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.बी.गाडे रूग्णालयात पोहोचले आणि मयताच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी तात्काळ डॉ. इमराना शेख या कंत्राटी वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करून जिल्हा शल्य चिकित्सकांपुढे हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर तणाव निवळला.