‘आयसीयू’मध्ये रुग्णाने घातला गोंधळ; खिडकीच्या काचेने हाताची नसही कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:25 AM2019-05-14T01:25:02+5:302019-05-14T01:26:00+5:30
तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केलेल्या रूग्णाने सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयातील आयसीयू विभागात चांगलाच गोंधळ घातला. खिडकीच्या काचा फोडून त्याच काचेने हाताची नस कापली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केलेल्या रूग्णाने सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयातील आयसीयू विभागात चांगलाच गोंधळ घातला. खिडकीच्या काचा फोडून त्याच काचेने हाताची नस कापली. यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. पोलीस व कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला पकडले. सध्या त्याच्यावर हातपाय बांधून उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे परिचारिका, आरोग्य कर्मचारी चांगलेच घाबरून गेले होते.
आकाश श्रीराम रोडगे (३५, रा.रांजणी ता.गेवराई) असे त्या रूग्णाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी त्याने विषारी द्रव प्राशन केले होते. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी अचानक त्याने वॉर्डमधील खिडक्यांची तोडफोड केली. तसेच पडलेल्या काचाने हाताची नस कापली. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी घाबरले. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच बेडवर टाकण्यात आले. मात्र, त्याची अवस्था पाहून तो ऐकत नसल्याने त्याचे हातपाय बांधण्यात आले व त्याच्यावर उपचार सुरू होते. औषधांमुळे कधीकधी रुग्ण स्वत:वरील नियंत्रण गमावून बसतात. हा प्रकारही असाच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. यासंदर्भात त्याच्याविरुध्द पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.