रुग्ण, नातेवाईकांचा चिखलातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:50+5:302021-06-16T04:44:50+5:30
बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात जाणारा रस्ता खराब झाला आहे. थोडाही पाऊस झाला की, या रस्त्यावर चिखल होतो. यातून ...
बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात जाणारा रस्ता खराब झाला आहे. थोडाही पाऊस झाला की, या रस्त्यावर चिखल होतो. यातून मार्ग काढताना रुग्ण व नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत असून, हा रस्ता तत्काळ दुरूस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे गतवर्षीच जिल्हा रुग्णालयातील आयपीडी आणि ओपीडी विभागाचे आदित्य महाविद्यालयाच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले. येथे शेकडाे रुग्ण व नातेवाईकांची ये-जा असते. परंतु बीड - पिंपळनेर रस्त्यावरून महाविद्यालयापर्यंत जाणारा रस्ता मातीचा आहे. वारंवार दुरूस्तीची मागणी करून केवळ मुरूम टाकून डागडुजी केली जाते. त्यामुळे थोडाही पाऊस झाला की, येथे चिखल होताे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना त्रास होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने वारंवार जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता करण्याबाबत सुचविलेही आहे. परंतु जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या टोलवाटोलवीमुळे मागील वर्षभरापासून हा रस्ता जैसे थे आहे. आजही या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करून रुग्ण व नातेवाईकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
--
हा रस्ता खराब झालेला आहे. याबाबत आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहोत. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी तत्काळ कार्यवाही करावी, म्हणून सूचना केलेल्या आहेत. परंतु अद्याप यावर काहीच कारवाई झालेली नाही. सोमवारी आणखी याबाबत शल्य चिकित्सकांची भेट घेतली आहे.
शाम भुतडा, प्राचार्य, आदित्य महाविद्यालय, बीड
--
माझ्याकडे पत्र आले आहे. याबाबत लवकरच कारवाई करून रस्ता दुरूस्त करण्यासाठी आदेशित केले जाईल. माझ्या अखत्यारित असेल तर यावर लगेच कारवाई केली जाईल. मी याची पूर्ण माहिती घेतो.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड