रुग्णाचा ऑक्सिजन बंद पडतोय अन् नर्स झटकतेय जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:37+5:302021-05-22T04:31:37+5:30
बीड : कोरोनाबाधित रुग्णाचे ऑक्सिजन बंद पडले. नातेवाईकांनी विनंती केल्यानंतरही हे आपले काम नाही, असे सांगत नर्सने हात झटकले. ...
बीड : कोरोनाबाधित रुग्णाचे ऑक्सिजन बंद पडले. नातेवाईकांनी विनंती केल्यानंतरही हे आपले काम नाही, असे सांगत नर्सने हात झटकले. त्यानंतर नातेवाईकांनी याबाबत तक्रार केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. हा प्रकार वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. आता या वॉर्डमधील दोन नर्सवर कारवाईची टांगती तलवार आहे.
वडवणी तालुक्यातील एक २९ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक ६ मध्ये ॲडमिट आहे. दोन दिवसांपासून त्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऑक्सिजन बंद होेते, परंतु, केवळ तोंडाला मास्क लावलेला होता. त्यामुळे रुग्णाला त्रास सुरु झाला. त्याने हा प्रकार तात्काळ मोबाईलवरुन नातेवाईकांना सांगितला. त्यांनी धाव घेतली. येथील सोनाली पवार या परिचारीकेकडे ऑक्सिजन लावण्याची विनंती केली. यावर त्यांनी हे काम वॉर्डबॉयचे आहे, असे सांगून दुर्लक्ष केले. यावर याच वॉर्डमधील दुसरी परिचारिका दीपांजली काळे यांनीही नातेवाईक म्हणतच असतात, आपण दुर्लक्ष करायचे, असे सांगत ऑक्सिजन लावण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार मेट्रन संगिता दिंडकर यांना कळवताच परिचारिका टाळ्यावर आल्या. त्यांनी तात्काळ ऑक्सिजन लावले.
दरम्यान, या गंभीर प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना माहिती दिली. कुंभार यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ.सुखदेव राठोड यांनी वॉर्डात धाव घेतली. नातेवाईक व परिचारिका यांना समोरासमोर करताच सर्व चुका निदर्शनास आल्या. यावर डॉ.गित्ते यांनी या दोन्ही कंत्राटी परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना डॉ.राठोड यांना दिल्या. परंतु, शुक्रवारी उशिरापर्यंत याबाबत आदेश निघाले नव्हते.
नातेवाईक बाहेर, आतमध्ये गलथान कारभार
संसर्ग वाढत असल्याचे कारण सांगत प्रशासनाने नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्यास बंदी घातली. परंतु, आतमध्ये परिचारिका, डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. आतमधील गलथान कारभारावर विश्वास नसल्यानेच नातेवाईक आत जाण्याचा हट्ट धरत असल्याचे दिसते. आरोग्य विभाग स्वत:च्या गलथान कारभारावर पांघरून घालण्यासाठी पोलिसांना पुढे करत असल्याचे दिसते. डॉ.राठोड यांनी फोन घेतला नाही.
वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन्ही परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. याचे आदेश निघतील.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड