ग्रामीण रुग्णालयात शौचालय अभावी रुग्ण व नातेवाईकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:20+5:302021-05-21T04:35:20+5:30
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी शौचालय असताना त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना उघड्यावर ...
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी शौचालय असताना त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असताना याकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजूस काही वर्षापूर्वी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु काही दिवसातच शौचालयाची दयनीय अवस्था झाली .
या शौचालयातील भांडे, बेसीन, दरवाजे हे तुटले व फुटले असून या ठिकाणी पाण्याचीही व्यवस्था नसल्याने हे शौचालय अनेक वर्षांपासून वापरात नाही. चिठ्ठी फाडण्याच्या ठिकाणी शौचालय असताना त्यास कायमचे कुलूप लावण्यात आलेले असते.
यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना शौचास उघड्यावर आजूबाजूला जाण्याची वेळ येत आहे.
या ठिकाणी रुग्ण ॲडमिट असताना किंवा त्यास सलाईन लावण्यात आले असता त्यास शौचालय कोठे जावे व कोठे नाही अशी अवस्था होताना दिसून येते. या ठिकाणी येणाऱ्या महिलांची तर खूपच अडचण होत असते. असे असतानाही येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच घेणे देणे राहिलेले नाही.
मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी अनेक जण कोरोना लस घ्यायला येत असून गर्दीमुळे त्यांना लस घ्यायला ४-५ तासापर्यंत वेळ लागत आहे.
या लस घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना शौचालयास जाण्याची वेळ आली तर याठिकाणी काहीच व्यवस्था दिसून न आल्याने या नागरिकांना घरचाच सहारा घेण्याची वेळ आली आहे. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुधारण्यासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना शौचालय अभावी आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
===Photopath===
200521\img_20210518_124305_14.jpg~200521\img_20201222_104808_14.jpg