रुग्णांनो, सरकारीतच या; आता दररोज होणार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:20+5:302021-09-22T04:37:20+5:30
बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यापुढे बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ...
बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यापुढे बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दररोज डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत, तसेच केज, परळी व गेवराई उपजिल्हा रुग्णालयांत आठवड्यातून एक दिवस शिबिर ठेवून शस्त्रक्रिया होतील. त्यामुळे रुग्णांनी आर्थिक बचत करण्यासाठी सरकारी रुग्णालयातच शस्त्रक्रिया कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे इतर आजारांसह शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. मध्यंतरी फेब्रुवारी, मार्च महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने शस्त्रक्रिया सुरू झाल्या होत्या; परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढली आणि १२ मार्चपासून शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या. सर्व मनुष्यबळ कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कामाला लावले होते; परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. चार रुग्णांना दृष्टी देऊन याचा मुहूर्तही झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी फीत कापून उद्घाटन केले, तर रुग्णांचीही तपासणी केली. नेत्रतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाघ, डॉ. राधेशाम जाजू, डॉ. नितीन रेंगे आदी पथक रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत.
---
खासगीपेक्षा सरकारीत अधिक सुविधा
जिल्हा रुग्णालयातील डोळ्यांचा विभाग सुसज्ज आहे. शस्त्रक्रियागृहही दर्जेदार आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही अनुभवी आहेत, तसेच सुविधाही खासगीपेक्षा चांगल्या आहेत. विशेष म्हणजे सरकारीत सेवा देणाऱ्यांचेच खासगी दवाखाने आहेत. त्यामुळे खासगीत जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करण्यापेक्षा सरकारीत येऊन मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. जे डॉक्टर रुग्णांची पळवापळवी अथवा रुग्णसेवेत हलगर्जी करतील, त्यांची तक्रार सीएस अथवा उपसंचालक, संचालकांकडे करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.
---
बीड व अंबाजोगाईत दररोज डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, तसेच केज, परळी व गेवराई उपजिल्हा रुग्णालयांत आठवड्यातून एक दिवस शिबिर ठेवले जाईल. नागरिकांनी सरकारी रुग्णालयातील सेवांचा लाभ घ्यावा.
डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक बीड.
210921\21_2_bed_9_21092021_14.jpeg
जिल्हा रूग्णालयात मंगळवारी रूग्णांचे डोळे तपासताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड. साेबत डॉ.चंद्रकांत वाघ, डॉ.राधेश्याम जाजू व पथक दिसत आहे.