व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण बेशुद्ध अन् कर्मचाऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:47 PM2021-11-24T16:47:10+5:302021-11-24T16:47:40+5:30
रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.
बीड : व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात राहिलेली ५० वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयात या रुग्णाला दाखल केल्यानंतर येथील तज्ज्ञांनी तपासले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बीडमधून औरंगाबादला रेफर करण्यात आले. हा सर्व प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता उघड झाला. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जामखेड येथील एक ५० वर्षीय इसम १८ ऑक्टोबर रोजी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. त्याच्यासोबत दाखल करताना एक नातेवाईकही होते. दारू, तंबाखू, गांजाचे व्यसन असल्याचे त्यांच्या प्रवेश पत्रावर लिहिलेले आहे. तसेच येरवडा येथे उपचार घेऊन आल्याचाही उल्लेख आहे; परंतु मंगळवारी सकाळी हा रुग्ण अचानक बेशुद्ध पडला. त्याला केंद्रातीलच दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल केले. फिजिशियनने तपासून मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले. डॉ. मोहंमद मुजाहेद यांनी तपासल्यानंतर रुग्ण गंभीर असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबादला रेफर केले. रेफर करेपर्यंतही हा रुग्ण शुद्धीवर आला नव्हता. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सोबत कोणी नसल्याने तो झाला नाही, तर केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बोलणे टाळले. रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.
मानसोपचार तज्ज्ञाची उपस्थिती बंधनकारक
व्यसनमुक्ती केंद्राला आरोग्य संचालकांची परवानगी लागते. मेंटल हेल्थ ॲक्ट २०१७ नुसार शासन मान्यता आवश्यक असते. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ कायमस्वरूपी हजर असणे अवश्यक आहे. नार्को टेस्ट विभागाकडून याची तपासणी होणे अपेक्षित असते; परंतु बीडमध्ये असे काहीच नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच चक्कर येणे, बेशुद्ध पडण्यासारख्या घटना घडतात. याची तपासणी होणे आवश्यक आहे.
काय म्हणतात, व्यसनमुक्ती केंद्रचालक
याबाबत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. यावर एकाने मी काहीच बोलू शकत नाही, आपण डॉ. राजकुमार गवळे यांना बोला, असा सल्ला दिला. यावर डॉ. गवळे यांना बोलल्यानंतर त्यांनी शेरकर यांना बोला, असे सांगितले. त्यानंतर शेरकर यांना संपर्क केला. यावर ते म्हणाले, आठवड्यातून एक वेळा मानसोपचार तज्ज्ञ येतात. त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषधी दिली जातात. मीसुद्धा बाहेर आहे. काय घडले हे मला पहावे लागेल, असे सांगितले.
नेमका रूग्ण कोण? सर्व गोंधळच
नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात संबंधित रूग्ण दाखल झाला, तेव्हा त्याचे नाव वेगळेच आहे. त्याला औषधी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर आणि प्रवेशासह हमीपत्रावर वेगळेच नाव असल्याचे समोर आले आहे. नातेवाईक कोण आणि रूग्ण कोण? याचाच गोंधळ उडाल्याचे या कागदपत्रांवरून दिसले. यावरून येथील कारभार ढिसाळ आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.
अधिक उपचारासाठी औरंगाबादला पाठवले
अपघात विभागातून कॉल येताच मी गेलाे. रूग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचार करणे आपल्याकडे शक्य नव्हते. प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला रेफर केले.
- डॉ.मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, बीड