पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:27 PM2024-03-15T12:27:50+5:302024-03-15T12:28:25+5:30
आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
पाटोदा: शहरातील मांजरसुंबा रोड परिसरातील साई फर्निचर शॉपचे गोडाऊन आणि त्याशेजारील पुट्टा खरेदी केंद्रास आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स मशीन, फर्निचर जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मांजरसुंबा परिसरात उमेश चौरे, बाळासाहेब चौरे, कशाब अनिल कुमार प्रसाद यांनी एक गोडाऊन भाड्याने घेतले आहे. यात इलेक्ट्रॉनिक मशीन आणि फर्निचरसह इतर साहित्य ठेवण्यात आले होते. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास गोडाऊनमधून अचानक आगीचे लोट बाहेर पडू लागले. आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
आगीचे वृत्त कळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा सुरू करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आजूबाजूला दाट लोकवस्ती होती. मात्र, अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणल्याने मोठी वित्तहानी झाली नाही.