शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:04 AM2019-11-07T00:04:08+5:302019-11-07T00:04:31+5:30
पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतकºयांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे.
बीड : पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतक-यांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे. मागील सात महिन्यांपासून यावर कसलीच कारवाई झालेली नाही. यावरून अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
पाटोदा शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर मांजरसुंबा रस्त्यावर एमआयडीसी उभारण्यासंदर्भात बीडच्या कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जागेची पाहणी केल्यानंतर याला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत रस्ते व जलवाहिणीसाठी तब्बल १ कोटी ४० लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला. मात्र, एमआयडीसी कार्यालयाने येथील शेतक-यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शेतक-यांनी हे काम अडविल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जुलै, मे महिन्यांपासून प्रश्न रखडलेला असतानाही कार्यालयाकडून शेतक-यांची भेट घेऊन अथवा पोलीस संरक्षण घेऊन कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
केवळ पत्र व्यवहार करून दिवस काढण्याचे काम एमआयडीसी कार्यालयाकडून केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे पाटोद्याच्या विकासात खोडा निर्माण झाला आहे.
उपअभियंता औरंगाबादहून चालवतात कारभार
बीडच्या एमआयडीस कार्यालयाला पूर्णवेळ उपअभियंता नाहीत. विनायक मुळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मात्र, ते आठवड्यातून एक ते दोन वेळा हजेरी लावतात. औरंगाबादहूनच बीडचा कारभार हाकला जात असल्याने कामे रखडले आहेत. शिवाय नवीन कामे करण्याचे तर दुरच परंतु कारभारही सुधारला जात नसल्याचे दिसून येत आहे. उंटावरून शेळ्या राखण्याचे काम होत असल्यानेच पाटोदा एमआयडीसीचे काम रखडल्याचे बोलले जात आहे.