महिला सीओंना धमकी देणाऱ्या नगराध्यक्षपतीला पाटोदा पोलीस निरीक्षकांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:04 PM2019-02-25T18:04:32+5:302019-02-25T18:04:55+5:30
आरोपीला अटक का केली नाही, याबाबत मी एसपी साहेबांना लेखी देईल, असे उत्तर दिल्याने, निरीक्षकांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
बीड : येथील नगरपंचायतच्या महिला मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष पतीविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी राजकीय दबावाला येथील पोलीस निरीक्षक बळी पडले होते, मात्र सक्षम महिला मुख्याधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेतल्याने हा दबाव हाणून पाडला. हा गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. येथील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे आरोपीला पाठिशी घालत आहेत. आरोपीला अटक का केली नाही, याबाबत मी एसपी साहेबांना लेखी देईल, असे उत्तर दिल्याने, निरीक्षकांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पाटोदा येथील नगरपंचायतमध्ये १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सर्वसाधारण सभेचे काम सुरु होते. यावेळी मुख्याधिकारी निलीमा कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती संदीप उर्फ गणेश नारायणकर हे ही उपस्थित होते. यावेळी चौदाव्या वित्त अयोगातील कामांची चर्चा झाली. कर्मचाऱ्याने मागील खर्चासाठी मान्यतेचा मुद्दा वाचून दाखवल्यानंतर नारायणकर यांनी हातपंप दुरुस्ती बिल देण्यास विरोध केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांबरोबर अरेरावी केली. तसेच अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र येथील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे राजकीय दबावाला बळी पडले आणि सकाळच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास रात्र केली. मात्र कांबळे यांच्या ठोस भूमिकेपुढे राजकीय दबाव फिका पडला आणि गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले. महिला अधिकाऱ्याशी अरेरावी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासारखा गंभीर गुन्हा असतानाही पाटोदा पोलीस याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आरोपीला पाठिशी घालून अटक करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पाटोदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठही संशयाच्या भोवऱ्यात
पोनि सिद्धार्थ माने यांनी आरोपीला अटक का केली नाही, हे वरिष्ठांना सांगू, अशा वक्तव्यामुळे वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वरिष्ठांचे सहकार्य नसेल तर वरिष्ठांनी एवढ्या दिवस आरोपीला अटक करण्याबाबत माने यांना का विचारणा केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माने मागील काही दिवसांपासून चांगलेच वादग्रस्त ठरू पहात आहेत.
आरोपी फरारच
आरोपीला अटक केलेली नसून तो फरारच आहे. त्याला अटक का केली नाही, हे मी एसपी साहेबांना लेखी देईल. तपासात काय केले, हे तुम्हाला सांगू शकत नाही. मी काय ते वरिष्ठांना बोलून घेईल.
- सिद्धार्थ माने, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, पाटोदा