माजलगावात लाखोच्या ठेवी घेऊन पतसंस्था अध्यक्ष फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:47 PM2017-09-19T17:47:00+5:302017-09-19T18:13:47+5:30
शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फरार झाल्याने आता ठेवीदारांनी सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.
माजलगाव ( बीड )दि.19 : शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फरार झाल्याने आता ठेवीदारांनी सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.
माजलगांव शहरात मोठया प्रमाणावर पतसंस्था आहेत.या पतसंस्थेच्या संचालक मंडळावर अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांच्यामुळे अनेकजण आपला मेहनतीने कमावलेला पैसा पतसंस्थांमध्ये ठेवतात. मोंढा येथील जयआनंद नागरी पतसंस्थेत शहरातील अनेकांनी आपला घामाचा पैसा गुंतवलेला होता.परंतु, पतसंस्थेचा अध्यक्ष विजय ललवाणी यांनी कर्ज वसुलीचा पैसा संस्थेत जमा न करता मोठया प्रमाणावर अपहार केला.त्यामुळे कर्जदारांनी कर्जफेड केलेली असली तरी त्यांना बेबाकी प्रमाणपत्र मिळत नाही. तर दुसरीकडे वसुली अभावी संस्था गोत्यात आली आहे. ठेवी परत मिळत नसल्याने आणि संस्था कायम बंद दिसत असल्याने ठेविदारांनी आता सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.
दरम्यान,पतसंस्थेच्या अध्यक्षाला सहनिबंधक यांनी संपर्क केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.आता तर तो फोन बंद करुन फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अध्यक्षच फरार झाल्यामुळे संचालक मंडळ मात्र चांगलेच गोत्यात आले आहे.
अनेकांचा जीव टांगणीला
पतसंस्थेचे कार्यालय कायम बंद असल्याने आता ठेवीदारांना नेमके कुठे जावे असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. याप्रकरणी ठेवीदार तुकाराम जोशी यांनी आपले 6 लाख 50 हजार रुपये या पतसंस्थेकडुन वसुल करुन द्यावेत अशी रितसर तक्रारच सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे. मोंढा भागात असलेल्या अनेक व्यापारी तथा नागरीकांच्या ठेवी या बॅंकेत आहेत.अध्यक्ष फरार तर संचालकांची चुप्पी साधल्याने ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
चौकशी करुन कारवाई करू
पतसंस्था ठेवी परत करीत नसल्याची तक्रार या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षाला संपर्क करण्यात आलेला आहे.परंतु,योग्य प्रतिसाद मिळत नाही.चौकशी करुन संचालक मंडळावर कारवाई करण्यात येईल.
-एस.बी. घुले, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , माजलगांव