बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री
By अनिल भंडारी | Published: September 30, 2023 06:58 PM2023-09-30T18:58:14+5:302023-09-30T18:58:46+5:30
उमेद गौरी गणेशोत्सव : जिल्ह्यात ११ तालुक्यांत आयोजन, नागरिकांचा प्रतिसाद
बीड : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत आयोजित ‘उमेद गौरी गणेशोत्सव’ विक्री व प्रदर्शन उपक्रमात जिल्ह्यातील ५४ गटांतील महिलांनी ३४ लाख रुपयांची विक्रमी विक्री केली. बीडसह जिल्ह्यातील ११ तालुक्यांत हा उपक्रम राबविण्यात आला असून गौरी गणेशासह ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याने बचत गटांना बाप्पा पावले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक व राज्याच्या अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान हा उपक्रम राबविला. सार्वत्रिक बाजारपेठा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध गावांमध्येसुद्धा स्वयंसाहाय्यता गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या प्रदर्शनात गौरी गणपती, महालक्ष्मी मूर्ती, मलाई पेढे, प्रसादाचे साहित्य, शोभेच्या वस्तू, कुरवड्या, पापड्या, खरवड्या, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, शोभेच्या विविध वस्तू, महिलांनी तयार केलेले सजावटीचे, विणकाम केलेल्या वस्तूंची विक्रमी विक्री झाली. यातून बचत गटांच्या महिलांनी ३४ लाख ३५ हजार रुपयांचा व्यवसाय केला. यामुळे गरिबातील गरीब कुटुंबांना या विक्रीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभले. या गटांना प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे ,जिल्हा व्यवस्थापक शकील शेख , जिल्हा व्यवस्थापक आशा पवार, मुरहरी सावंत तसेच तालुका व्यवस्थापकांचे मार्गदर्शन लाभले.
प्रदर्शन व बाजारपेठेत स्टॉल
बचत गटाच्या ५४ महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. अंबाजोगाई, आष्टी, केज, गेवराई, धारूर, परळी, पाटोदा, बीड, वडवणी, शिरूर कासार तालुक्यांत प्रदर्शन आणि स्टॉल लावण्यात आले होते.
१७ हजारांवर शाडूच्या मूर्तींची विक्री
५४ गटाच्या महिलांनी गणपती आणि लक्ष्मी मुखवटे स्वत: कारखान्यात तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. २० हजार ७०९ मूर्तींपैकी १७ हजार ७७ मूर्तींची विक्री झाली. यात शाडूच्या मूर्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. एकूण ३४ लाख ३५ हजार १४० रुपयांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.