आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:49+5:302021-04-09T04:35:49+5:30
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यातच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अडवणूक ...
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यातच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अडवणूक केली जात असून, अगोदर ॲडव्हान्स भरा, मगच उपचार, अशी भूमिका बीड शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दाखल होण्यापूर्वीच ५० हजार ते १ लाख रुपयांची मागणी केली जात आहे. तक्रारी नाहीत, असे सांगत प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज ५०० ते ७०० नवीन रुग्णांची भर पडत असल्याने बाधितांच्या संख्येने २९ हजारांचा आकडाही ओलांडला आहे. तर दुसऱ्या बाजूला होणारा मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत अथवा कमी आहेत अशांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. अगोदरच कोरोनाने घाबरलेले लोक सेंटरमध्ये गेल्यावर जास्तच घाबरतात. त्यामुळे आता ते खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. येथे त्यांची लाखोंची लुटमार होत असल्याचे समाेर येत आहे.
दरम्यान, सध्या तर बीडसह जिल्ह्यातील बहुतांश खासगी कोविड सेंटरमध्ये बाधित असो वा संशयित अगोदरच ५० हजार ते १ लाख रुपये ॲडव्हान्स भरल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. दाखल करून घेतल्यावरही त्यांच्याकडून शासकीय दरापेक्षाही जादा बिल घेतले जात असल्याचे अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. जास्त पैसे घेऊनही त्यांना कसल्याच सुविधा नाहीत, हे देखील खरे असून, जिल्हा आरोग्य विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत असून, ही लुटमार व अडवणूक थांबवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली आहे.
आयसीयू नव्हे जनरल वॉर्ड
ज्या रुग्णाला आयसीयू म्हणून दाखल केले जाते, तेथे जनरल वॉर्डपेक्षाही खराब व्यवस्था असते. शेजारी शेजारी खाटा आणि सर्वत्र गर्दी असते, तसेच शौचालय आणि ऑक्सिजनची व्यवस्थाही व्यवस्थित नसते, व्हेंटिलेटर ठेवायलाही खुर्ची नसते, अशी बिकट परिस्थिती असतानाही शासनाचे दर आहेत, असे सांगून एका खाटेसाठी प्रतिदिन ९ हजार रुपये वसूल केले जात आहेत. खासगी रुग्णालयांतील हे प्रकार दिसत असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
रक्त, औषधही बाहेरुनच
एखाद्या रुग्णाला रक्त अथवा औषध लागत असतील तर थेट नातेवाइकांच्या हातात चिठ्ठी देऊन आणण्यास सांगितले जात आहे. अगोदरच नातेवाईक घाबरलेले असतात, त्यात डॉक्टरांकडून हातात चिठ्ठी ठेवली जाते. औषधांचा तुटवडा असल्याने नातेवाइकांना काळ्या बाजारातून खरेदी करावे लागते. यात त्यांची आर्थिक लूट होत आहे. खासगी रुग्णालयात सर्व औषध उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु ते नातेवाइकांचीच धावपळ करतात.
--
जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटर २०
खासगी कोविड सेंटर ३३
एकूण खाटांची क्षमता ४२३६
एकूण मंजूर खाटा ३७९६
एवढ्या खाटांवर रुग्ण उपचाराखाली २९०९
एकूण रिक्त खाटा ८८७