रीडिंग घेऊनच वीजबिल द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:52+5:302021-07-30T04:34:52+5:30

पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था अंबाजोगाई : शहरात शासकीय विश्रामगृहालगत पोलीस कर्मचारी वसाहत आहे. या वसाहतीत पोलिसांची अनेक कुटुंबे राहतात. ...

Pay the electricity bill only after taking the reading | रीडिंग घेऊनच वीजबिल द्यावे

रीडिंग घेऊनच वीजबिल द्यावे

Next

पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था

अंबाजोगाई : शहरात शासकीय विश्रामगृहालगत पोलीस कर्मचारी वसाहत आहे. या वसाहतीत पोलिसांची अनेक कुटुंबे राहतात. ही वसाहत खूप वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या भिंती, दरवाजे, खिडक्या नादुरुस्त आहेत. फरशा उखडलेल्या आहेत. आवश्यक ती दुरुस्तीही स्वतः राहणारे करून घेतात. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीत बांधकामे करून पोलीस बांधवांना सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

बेरोजगारीमुळे युवा पिढीत नैराश्य

अंबाजोगाई : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे जे कामावर होते, तेही बेरोजगार झाले आहेत. तर, अनेकजण नवीन कामाच्या शोधात आहेत. मात्र, बाजारपेठेत असणारी आर्थिक मंदी व लॉकडाऊन यामुळे अनेकांना अपयश येत असल्याने तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे यावरही उपाय शोधण्याची खरी गरज आता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुन्हा वाढला प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

बीड : शहरासह तालुक्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सगळीकडे कचरा दिसून येत आहे. फळविक्रेते, भाजीविक्रेते, किराणा दुकानदार पुन्हा मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करू लागले आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून केली जात आहे.

शेतकऱ्यांना आठ तास हवी वीज

धारूर : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली, परंतु शेतकऱ्यांना अद्याप दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. रात्री शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

हातपंप दुरुस्तीची मागणी

पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपांवर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त आहेत.

स्वच्छतेच्या अभावाने आजाराला आमंत्रण

अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगर परिषद प्रशासनाने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी मोहीम आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

महावितरणने कर कमी करावेत

माजलगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध करआकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा करआकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून महावितरणने वीजग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.

अवैधरित्या दारूविक्री सुरूच

वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरित्या दारूविक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. परंतु, अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

रस्त्यावर असतात वापरलेले मास्क

माजलगाव : अंबाजोगाई शहर व परिसरात रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलेले मास्क पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनाही याचा संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी रस्त्यावर वापरलेले मास्क टाकू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कमी दाबाने वीज, शेतकरी त्रस्त

बीड : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युतपंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युतपुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.

भाजी मंडईतील कोंडी हटेना

बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडाबाजार भरतो. परंतु, येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.

कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी आहे.

नळांना तोट्यांअभावी पाण्याचा अपव्यय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात जेव्हा पाणीपुरवठा होतो, तेव्हा बऱ्याच वेळा पाणी वाया जाते. शहरात आजही अनेकांच्या नळांना तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी नळांना तोट्या बसविण्यात याव्यात, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Pay the electricity bill only after taking the reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.