दोन दशकांच्या वनवासानंतर मयूर अभयारण्य फुलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 04:44 AM2019-11-10T04:44:39+5:302019-11-10T09:30:24+5:30
दोन दशकांच्या वनवासानंतर या अभयारण्याने आता कात टाकली असून, मनावर घेतले तर चांगले कामही होऊ शकते, हे वन विभागाने दाखवून दिले आहे.
अनिल भंडारी
बीड : पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील मयूर अभयारण्य मोरांच्या संख्येमुळे ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून शासनाने घोषित केले खरे. मात्र, वन विभागाच्या उदासीनतेने त्याला बकाल करून टाकले. दोन दशकांच्या वनवासानंतर या अभयारण्याने आता कात टाकली असून, मनावर घेतले तर चांगले कामही होऊ शकते, हे वन विभागाने दाखवून दिले आहे.
८ डिसेंबर १९९४ पासून अधिसूचित झालेल्या या परिसरात मोरांची संख्या प्रारंभी चार हजार होती. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या अभयारण्याची वाईट अवस्था होत गेली. परिणामी, मोरांचे, वन्यजीवांचे स्थलांतर सुरू झाले. २०१२ मध्ये तर मोरांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी झाली. अशा बिकट परिस्थितीतही पर्यावरणप्रेमी, निसर्गमित्र, लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता, वन मंत्रालयापर्यंत केलेला पाठपुरावा यामुळे शासनालाही दखल घ्यावी लागली. आॅक्टोबर २०१५ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून प्रकाश बारस्कर रुजू झाले. त्यानंतर मात्र मयूर अभयारण्याने कात टाकायला सुरुवात केली.
वणवा तात्काळ विझविण्यासाठी फायर ब्लोअर आणले. पाणवठे स्वच्छ करून भरण्यात येऊ लागले. निसर्ग संपत्तीच्या रक्षणासाठी जनजागृतीवर भर दिला जाऊ लागला. अन्न-पाण्याची सोय झाल्याने पक्षी, वन्यजीवांचे स्थलांतर थांबले. बारस्कर यांच्या बदलीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास गिते यांनीही सकारात्मक दृष्टीने काम सुरू ठेवले. परिणामी, या परिसरात शिकार बंद झाली. प्राण्यांच्या नोंद व निरीक्षणासाठी ६ ट्रॅप कॅमेरे, ६ दुर्बीण उपलब्ध केल्या.
परिसरातील ६ गावांत ७५० कुटुंबांना शासकीय अनुदानावर गॅस जोडणी दिल्याने हा परिसर धूर व प्रदूषणमुक्त झाला. दुष्काळात लोकसहभाग वाढविल्याने अन्न-पाण्याची सोय झाली. त्यामुळे पक्षी, वन्यजीवांचे स्थलांतर रोखण्यात यश आल्याचे वनपाल अजय देवगुडे यांनी सांगितले.
अभयारण्य क्षेत्रातील निरगुडी, खडकवाडी, बेदरवाडी भागात वन विभागाचे ६० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याची माहिती अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास मारुती गिते यांनी दिली.
>2012-13
मयूर अभयारण्यात १,४२५ मोर,
५६ हरिण, २१ रानडुक्कर, ११०
ससे, ६ कोल्हे, १४ खोकड, असे
१ हजार ६३२ प्राणी होते.
2018-19
आता १० हजार १२१ वन्यजीव आहेत. यात २,२५२ मोर (नर), तर ५,९५१ मोर (मादी) आहेत. उर्वरित १,९१८ इतर पक्षी, प्राणी आहेत. स्थानिक पक्ष्यांच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.
ग्लिरिसिडिया कमी करून करवंद, कार-बोर, पिठाणी, वड, पिंपळ, उंबर, निंद्रूक, पिप्री, पळस, बहावा, पांगारा, काटेसावरची लागवड करून त्यांची जोपासना करण्याची गरज आहे. - सिद्धार्थ सोनवणे, अध्यक्ष, वाईल्ड-लाईफ प्रोटेक्शन अॅण्ड सँक्च्युरी असोसिएशन
>शिकारी प्राणी : बिबटे, तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, रानमांजर
शिकारी पक्षी : घुबड (शृंगी, आखूड कानाचे, रक्तलोचनी, गवहाणी, पिंगळा), बोनेली गरुड, सर्पगरुड.
दुर्मिळ व संकटग्रस्त : खवले मांजर, उद मांजर, जावडी मांजर, इतर प्राणी काळवीट, चिंकारा, नीलगाय, वटवाघळ, रानडुकरे, ससा.
सरपटणारे प्राणी :
अजगर, साप, मांडूळ.
इतर पक्षी-प्राणी :
शिक्रा, कापशी,
ससाणा, टकचोर,
खाटीक, चातक,
बुलबुल, वेडा राघू,
कोकिळा, सुतार,
हुपो, तितर,
लावा, धाविक,
माळटिटवी,
पाखुरडी,
चंडोल,
रातवा.