बीडमध्ये भरधाव वाहनाने पादचाऱ्यास चिरडले; मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने ओळख पटेना
By संजय तिपाले | Published: September 10, 2022 11:40 AM2022-09-10T11:40:54+5:302022-09-10T11:43:25+5:30
मृत व्यक्तीच्या अंगातील कपड्यांवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बीड: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयताचे वय अंदाजे ४० आहे. त्याच्या अंगात टीशर्ट व जीन्स पँट आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी अधिकारी- अंमलदार बाहेरच होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक देविदास आवारे, हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहावरून वाहने जाऊ नयेत म्हणून वाहतूक एकमार्गी केली. रुग्णवाहिका पाचारण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीच्या अंगातील कपड्यांवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघाताबद्दल किंवा मृत व्यक्तीबद्दल माहिती असल्यास बीड ग्रामीण पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी केले आहे.