खराब बियाणांपोटी कंपनीला दंड; बीडच्या शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:14 AM2017-12-11T01:14:39+5:302017-12-11T01:15:18+5:30
शेतात लावलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मंजूर करत संबंधित शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश देत ग्रीन गोल्ड कंपनीला पाच हजार रुपये दंड औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाने सुनावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतात लावलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मंजूर करत संबंधित शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश देत ग्रीन गोल्ड कंपनीला पाच हजार रुपये दंड औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाने सुनावला.
बीड तालुक्यातील पोथरा येथील शेतकरी अनंतराव हावळे व दीपक हावळे यांनी स्वत:च्या शेतात पेरण्यासाठी जे. एस. ३३५ सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. योग्य पावसाच्या वेळी, योग्य पद्धतीने पेरणी केली होती. पेरणीनंतर पंधरा दिवसात उगवण झाली नाही. त्यामुळे हावळे यांनी कंपनीकडे तक्रारही केली. मात्र कंपनीने दखल गेतली नाही. त्यामुळे शेतक-याने बियाणे तक्रार निवारण समिती व तालुका कृषी अधिकाºयांकडे धाव घेतली. त्यानंतर या समितीने तक्रारदार शेतक-यांच्या शेतजमिनीवरील सोयाबीनची पाहणी करुन बीज प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासणीसाठी बियाणे पाठवावे असा अहवाल दिला.
मात्र, कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा ग्राहक मंचकडे नुकसानीबाबत तक्रार करुन भरपाईची मागणी केली. शेतक-यांची तक्रार मंजूर झाली. जिल्हा मंचने दिलेल्या आदेशाच्या विरोधात औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठात अपील दाखल केले.
यात कंपनीचे वकील व शेतकºयांचे वकील अतुल हावळे यांचा आयोगापुढे युक्तीवाद झाला. या प्रकरणात शेतक-यामार्फत अॅड. अतुल हावळे व अॅड. योगेश बोबडे यांनी काम पाहिले.
९ टक्के व्याज देण्याचा आदेश
आयोगाने शेतकºयाच्या शेतातील घटनास्थळाचा पंचनामा, शेतक-याचे किती नुकसान झाले व दरम्यानच्या काळात सोयाबीनला किती भाव होता याची शहानिशा करुन निकृष्ट व उगवण न झालेल्या बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकºयाला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचे आदेश दिले. तसेच बियाणे कंपनीला पाच हजार रुपये दंड सुनावला.