कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 03:10 PM2020-08-14T15:10:55+5:302020-08-14T15:34:37+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक सीसीसीमधून जेवणाबद्दल तक्रारी प्राप्त होत्या.
बीड : अंबाजोगाई येथील कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट नाश्ता आणि जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह क्वारंटाईन लोकांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेली आहेत. वेळेवर व दर्जेदार जेवण, नाश्ता पुरविण्यासाठी बीडच्या अब्दुल गणी यांना कंत्राट देण्यात आले आहे; परंतु जिल्ह्यातील प्रत्येक सीसीसीमधून जेवणाबद्दल तक्रारी प्राप्त होत्या. गुरुवारीही अंबाजोगाईच्या सीसीसीबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत होत्या. याची तपासणी करण्यासाठी सायंकाळी ६ वाजता तहसीलदार संतोष रुईकर यांनी भेट दिली. यावेळी रुग्णांनी गाऱ्हाणे मांडले, तसेच कंत्राटदाराचा प्रतिनिधी योगेश नीळकंठ यानेदेखील ही बाब सर्वांसमोर मान्य केली. त्यामुळे रुईकर यांनी तात्काळ अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. कंत्राटदाराकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्याची शिफारस यात केली आहे.
कंत्राटदार कोविड योद्धा
काही दिवसांपूर्वी याच कंत्राटदाराला जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून प्रमाणपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. याच कंत्राटदाराला जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्था व सीसीसीमध्ये जेवण पुरविण्याची जबाबदारी दिलेली आहे.