पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

By शिरीष शिंदे | Published: September 19, 2023 03:59 PM2023-09-19T15:59:26+5:302023-09-19T15:59:52+5:30

बीड जिल्ह्यातील स्थिती : योजना शेवटच्या टप्प्यात, वाटपाची गती मंदावली

Pending grant of eight thousand farmers under Pokra scheme | पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

googlenewsNext

- शिरीष शिंदे
बीड: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ७ हजार ७३० लाभार्थींचे अनुदान जवळपास सहा महिन्यांपासून रखडले आहे. पोकरा योजना आता अंतिम टप्प्यात आली असून लाभार्थींना लवकर अनुदान मिळणे आवश्यक आहे. विलंब लागत असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यात सुरू असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेचा पहिला टप्पा आता संपत आला आहे. मागील दोन महिन्यांपासून नवीन अर्ज स्वीकृती करणे बंद आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक घटक बंद करण्यात येत आहे. दरम्यान, पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. त्यानंतर ज्या घटकासाठी म्हणजे ठिबक, तुती लागवड, स्प्रिंकलर यासाठी शेतकऱ्यांना आधी स्वत: पैसे खर्च करावे लागत होते. कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जात होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून ७ हजार ७३० लाभार्थींचे अनुदान रखडलेले आहे. ७व्या डेस्कवर म्हणजेच मुंबई येथील प्रकल्प संचालक स्तरावर प्रलंबित आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वत: पैसे खर्च केले असल्याने तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांची स्थिती नाजूक
सध्या पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. अशा स्थितीत शिवारामध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी नसल्याने पिके हातची जाण्याची शक्यता आहे. दुष्काळासारखी स्थिती ओढवली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. पिके वाया गेली तर त्यांना दुसरा मोठा आर्थिक आधार नाही. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी स्व:खर्चातून पूर्ण केलेल्या घटकासाठीचा निधी तात्काळ देणे अपेक्षित आहे.

४३ हजार ३७४ शेतकऱ्यांना १८ हजार ४८१ कोटी वाटप
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४३ हजार ३७४ शेतकऱ्यांना १८ हजार ४८१ कोटी रक्कम अनुदानस्वरूपात वाटप करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले असले तरी आता पोकरा योजनेचा अंतिम टप्पा आला असल्याने उर्वरित अनुदान रक्कम वेळेत दिली पाहिजे.

आकडेवारी आहे, पण रक्कम नाही
४३ हजार ३७४ शेतकऱ्यांचे अनुदान प्रकल्प संचालक कक्षस्तरावर प्रलंबित आहे. परंतु किती कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे, याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. ही आकडेवारी काढता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे आहे रखडलेले अनुदान
तालुका - संचालकस्तरावर प्रलंबित - वितरीत अनुदान वाटप
अंबाजोगाई - ४५५ - ४६०८
केज - १४०० - ५१५३
परळी - २०४ - २११३
बीड - ८२५ - ५३७७
आष्टी - ५३४ - ३६७६
पाटोदा - २७ - ८२६
शिरूर - १४५ - १५३७
धारूर - २३७ - ३२४९
गेवराई - ३४२५ - १३३११
माजलगाव - २८९ - २४३८
वडवणी - १८९ - १०८६
एकूण - ७७३० - ४३३७४

Web Title: Pending grant of eight thousand farmers under Pokra scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.