दसरा मेळाव्यासाठी सावरगावात जनसागर लोटला; पंकजा मुंडे काय बोलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:53 PM2023-10-24T13:53:54+5:302023-10-24T13:54:20+5:30
शिवशक्ती परिक्रमेस मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता तर दुसरीकडे जीएसटीचे १९ कोटी थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर सेंट्रल जीएसटीने कारवाई केली.
सावरगाव: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे.मागील काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांना भाजपने राज्याच्या राजकारणातून दूर केल्याचे चित्र आहे. यावर त्यांनी खंत देखील व्यक्त केली. आता आज सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजाताई काय बोलणार? भूमिका स्पष्ट करणार का? याकडे त्यांच्या समर्थकांसह राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यानंतर शिंदे गट हातमिळवणी करत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. मात्र, सत्तांतरानंतरही पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यांना राज्याच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात पक्षांतर्गत विरोधकांचे प्रयत्न राहिले. त्यातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने नेमकी परळी मतदारसंघात त्यांची अडचण झाली. काही दिवस मौन राखल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा काढली. यावेळी राज्यात विविध भागांतून मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता तर दुसरीकडे जीएसटीचे १९ कोटी थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर सेंट्रल जीएसटीने कारवाई केली.
दरम्यान, एका मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी या सर्व विषयांवर त्यांनी त्यांची बाजू मांडली होती.यावेळी राजकीयदृष्ट्या समाधानी म्हणाल तर मी स्वत: प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत, काय सुरू आहे मला कळत नाही. माझ्या वैयक्तिक राजकारणापुरते मी सांगते. पुढच्या भविष्यात काय होणार आहे. राजकारणात पुढचे निर्णय काय होणार आहेत याकडे सगळे लक्ष ठेवून आहेत तसं मीदेखील लक्ष ठेवून आहे असं विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. यामुळे आज मेळाव्यास संबोधित करताना त्या नेमक्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.