औरंगाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:39 AM2019-04-27T00:39:06+5:302019-04-27T00:39:56+5:30
औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला.
बीड : औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. पंक्चर झालेले कारचे चाक बदलत असताना रोड रॉबरीची ही थरारक घटना बीड तालुक्यातील चौसाळा बाह्यवळण रस्त्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
बाळासाहेब ढोणे (४०), वैशाली बाळासाहेब ढोणे (३५), भागिरथी त्र्यंबक ढोणे (६०) व चालक चतुरसिंह लक्ष्मण राजपुत (४७ सर्व रा. औरंगाबाद) अशी जखमी भाविकांची नावे आहेत. बाळासाहेब ढोणे हे किराणा व्यापारी असून औरंगाबादमध्ये ते किराणा दुकान चालवतात. पत्नी वैशालीसह त्यांचे दोन मुले व भागिरथी ढोणे यांच्यासह ते कारमधून (क्र.एम.एच.२० डी.एफ ०७३०) गुरुवारी रात्री उशिरा औरंगाबाद येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते चौसाळा बायपासनजीक आले. याचवेळी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले. चालकाने पंक्चर झालेले चाक काढून तेथे गाडीतील दुसरे चाक बसवले. ते पुढे निघणार याचवेळी अंधारातून पाच ते सात चोरटे हातात लाकडी दांडके घेवून तेथे आले. काही समजण्याच्या आत त्यांनी कारमधील कुटूंबीयांना बेदम मारहाण सुरु केली. कारमधील दोन लहानगे मात्र चोरांच्या मारहाणीतून बचावले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच भयभीत झाले. चोरट्यांनी गाडीवरही दगडफेक करत काचा फोडल्या. कारमधील वैशाली ढोणे व भागीरथी ढोणे यांनाही मारहाण करत त्यांच्या कानातील दागिने हिसकावुन घेत गंभीर दुखापत केली. तर बाळासाहेब ढोणे व चालक चतुरसिंह यांचेही डोके फोडले. बेदम मारहाण होत असल्याने आमच्याकडील ऐवज घेवून जा पण मारहाण करु नका, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र चोरट्यांनी मारहाण सुरुच ठेवली. किंमती ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे पसार झाले. या घटनेने चौसाळा परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी चौसाळा चौकीतील कर्मचाऱ्यांसह स्थागुशाच्या पोलीसांनी भेट दिली. नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पेट्रोलपंपाचा घेतला आसरा
चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेतील भाविक जवळच्या पेट्रोलपंपावर पोहचले. घडलेला प्रकार कथन केल्यानंतर चौसाळा चौकीतील कर्मचारी तिथे आले त्यानंतर सर्वांना चौसाळा चौकीत व नंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाविकांची कार पोलीसांनी चौसाळा चौकीसमोर आणून उभी केली.