'जनतेचे प्रेम,आशीर्वादच माझी ढाल'; परळीत भव्य स्वागतानंतर धनंजय मुंडे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:23 PM2023-02-13T13:23:09+5:302023-02-13T13:24:55+5:30
जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनमधून भव्य हार, बँड पथके, मुंबई येथील ढोल ताशाच्या गजरात धनंजय मुंडे याचे स्वागत करण्यात आले.
परळी (बीड): परळीच्या जनतेने मला कधीच मोजून मापून प्रेम दिले नाही, जे दिले ते भरभरून दिले आहे. त्यामुळे मी आजपर्यंत काय करू शकलो, याचा हिशोब देखील मोजणार नाही. आजवर जी कामे केली, कोविड काळात जे मदतकार्य केले, विकासाचे जे स्वप्न घेऊन आपण वाटचाल करतो आहोत, त्याचे मोजमाप तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा परळीचे नाव देशात अभिमानाने घेतले जाईल, असा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
ग्रामीण भागातील विकासाच्या पूरक योजना यासाठी आपण कायम प्रयत्नशील असून पुढेही हे विकास पर्व अधिक जबाबदारीने पूर्ण करू व कायम सेवेत राहू, असे अभिवचन मुंडे यांनी पुढे बोलताना दिले. मागील महिन्यात परळीत कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन सुमारे 40 दिवसांनी धनंजय मुंडे प्रथमच परळीत परत आले होते, यावेळी परळी मतदारसंघात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील मोंढा मैदान येथे त्यांचा स्वागत सत्कार रविवारी करण्यात आला
छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धनंजय मुंडे यांची पेढेतूला करून आनंद साजरा केला. तेथून धनंजय मुंडे यांची वाजतगाजत स्वागत रॅली काढण्यात आली. ही रॅली पुढे उड्डाण पूल, सुभाष चौक, रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मार्गे मोंढा मैदान येथे पोचली. रॅली मार्गात केरळ, उज्जैन, तिरुपती बालाजी येथील खास बँड पथके, मुंबई येथील ढोल ताशा पथक तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, आमदार म्हणून हजारो मतांनी तुम्ही निवडून दिले. तुमच्या आशीर्वादाने मंत्री झालो. पण पुढे दोनवेळा कोरोना बाधा झाली, मेंदूचा अटॅक आला, आता अपघात झाला. तसेच मधल्या काळात राजकीय सोबतच कौटुंबिक विषयात देखील वेगवेगळे आरोप झाले. मात्र या सर्व परिस्थितीत मतदारसंघातील जनतेचे प्रेम व आशीर्वादच माझी ढाल होती. त्याचमुळे मी आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे, असे भावोद्गार देखील त्यांनी व्यक्त केले.
परळी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मला आजवर इथल्या जनतेने अभूतपूर्व प्रेम दिले. जोपर्यंत तुमचे हे प्रेम आहे तोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे. अखेरच्या श्वासापर्यंत माझे जीवन माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सेवेत समर्पित आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील जनतेप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी त्यांनी राम अवतार त्यागी यांच्या,
'मेरे स्वप्न अर्पित, मेरे प्रश्न अर्पित
आयु का क्षण क्षण मेरे समर्पित
चाहता हूँ ऐ परली की धरती तुझे कुछ और भी दूं।' या ओळीतून भावना व्यक्त केल्या.
गोपीनाथ गड परिसरात पांगरी ग्रामपंचायतचे सरपंच सुशील वाल्मिकराव कराड तसेच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पांगरी ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पांगरीकरांनी आपल्या लाडक्या नेत्यावर पुष्पवृष्टी करत देशाच्या विविध भागातून बोलवलेल्या खास बँड पथकांच्या वाद्यवृंदात धनंजय मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, . आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, रा कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ,राजस्थानी मल्टिस्टेट चेअरमन चंदुलाल बियाणी, नाथऱ्याचे सरपंच अभय मुंडे प्रा. मधुकरराव आघाव, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, , बाळासाहेब देशमुख, प्रा. विनोद जगतकर जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस, जाबेर खान पठाण, ऍड. गोविंदराव फड, यांसह विविध आघाडीचे पदाधिकारी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तसेच मान्यवर उपस्थित होते. महेश मुंडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.