डीझेल चोरीतील कमिशनमध्ये टक्केवारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:58+5:302021-04-07T04:34:58+5:30

लोकमत फॉलोअप बीड : जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेतील डिझेल चोरी करून यातील राहिलेल्या पैशांतील टक्केवारी चालकांपासून ते एका अधिकाऱ्यापर्यंत जात ...

Percentage in commission on diesel theft? | डीझेल चोरीतील कमिशनमध्ये टक्केवारी?

डीझेल चोरीतील कमिशनमध्ये टक्केवारी?

Next

लोकमत फॉलोअप

बीड : जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेतील डिझेल चोरी करून यातील राहिलेल्या पैशांतील टक्केवारी चालकांपासून ते एका अधिकाऱ्यापर्यंत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनात व्यस्त असलेल्या शासनाची नजर चूकवून सुरु असलेली ही लूटमार 'लोकमत'ने 'स्टींग ऑपरेशन'मधून समोर आणताच चौकशीला सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलांना घरापर्यंत नेऊन सोडण्यासाठी जननी सुरक्षा योजनेंतर्गत रुग्णवाहिका कार्यरत आहेत. याच रुग्णवाहिकेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल अतिथीच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल भरले जाते. कार्यालयातील कंत्राटी लेखापाल नरसींग राऊत यांच्याकडून पावती घेत ती पंपावर दिली जाते. प्रत्यक्षात जास्त लिटरची पावती घेऊन अर्धेच डिझेल टाकले जात असल्याचा प्रकार सोमवारी 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला होता. 'कट' मारलेल्या डिझेलमधून नंतर टक्केवारीने पैसे घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या साखळीत रुग्णवाहिका चालक, पेट्रोल पंप चालक, पावती देणारा लेखापाल आणि रजिस्टरवर स्वाक्षरी करणारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व मागील अनेक महिन्यांपासून सूरु असुन आतापर्यंत लाखोंची लूट केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लोकमतच्या स्टींगने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी प्रकरणात स्वत: लक्ष घातले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. मंगळवारी सकाळीच डॉ.गित्ते यांनी संबंधितांना बोलावून कान उघडणी केली. तसेच याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. आता या चौकशीला नेहमीप्रमाणे दिरंगाई होते की, तात्काळ पूर्ण करुन कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

इतर विभागांचीही व्हावी चौकशी

डिझेल चोरी ही केवळ आरोग्य विभागातच होत नसून इतर कार्यालयांमध्येही होत असल्याच्या तक्रारी आहेत. चालक आणि पंप चालक हे संगनमताने यात घोळ करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यात लक्ष घालून सर्वच विभागातील वाहने व इंधनाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

चालक म्हणतो, मी पूर्ण डिझेल भरले...

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांच्यापुढे रुग्णवाहिका चालकाने आपण पूर्ण डिझेल भरल्याचे सांगितले. मिटरमध्ये काही तरी घोळ असू शकतो, असा संशयच त्याने व्यक्त केला. तर सोमवारी कामगाराने या चालकाने परतल्यावर राहिलेले डिझेल भरु असे सांगितले होते, याचा पुरावा लोकमतकडे आहे. आता कोण खोटे आणि कोण खरे? चौकशीनंतर समोर येणार आहे.

मी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना बोललो आहे. चौकशी करुन पुढील माहिती दिली जाईल.

अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड

रुग्णवाहिकेतील डिझेल प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी पत्र काढले आहे. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल.

डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: Percentage in commission on diesel theft?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.