रबी हंगामातील पेरा दोन टक्के; धान्याचा तुटवडा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:36 AM2018-11-01T00:36:06+5:302018-11-01T00:38:18+5:30
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप हंगामासह रबीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र जवळपास ३ लाख १० हजार हेक्टर आहे. परंतु, त्यापैकी फक्त दोन टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तसेच ज्वारी, गहू पिकांची पेरणी कमी झाल्याने चारा व धान्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.
प्रभात बुडूख
बीड : यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप हंगामासह रबीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र जवळपास ३ लाख १० हजार हेक्टर आहे. परंतु, त्यापैकी फक्त दोन टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तसेच ज्वारी, गहू पिकांची पेरणी कमी झाल्याने चारा व धान्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.
यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या थोड्याफार पावसावर खरिप हंगामात जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचा पेरा झाला होता. पेरणीनंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे कापूस, उडीद, मूग यासह इतर खरिप पिकांचा उतारा अतिशय कमी आला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यातील रबी हंगामाचे पेरणी क्षेत्र ३ लाख १० हजार हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ६ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षी रबी हंगामात सरासरीच्या तुलनेत ११० टक्क्यापेक्षा अधिक पेरणी झाली होती. मात्र, यावर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा सर्वाधिक असतो. सोबत गहू, हरभरा, मका, करडई ही पिके देखील घेतली जातात. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे अनेक पिकांची पेरणीच झाली नाही. पेरणी अहवाल शासनाकडे पाठविल्याचे कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांनी सांगितले.
पेरा कमी झाल्याने चा-याचे संकंट
रबी हंगामात ज्वारी, गहू पिकांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर झाला आहे. पुढील काळात चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. बहुतांश पशुधन ज्वारीच्या कडब्यावर अवलंबून आहे. उत्पादन कमी असल्यामुळे धान्यांचा तुटवडा देखील निर्माण होणार असल्याचे बीड तालुक्यातील खडकी येथील शेतकरी आशिष देशमुख म्हणाले.
पेरणी केलेली ज्वारी, गहू, हरभरा ही पिके उगवली आहेत. मात्र, जमिनीत ओलावा शिल्लक नसल्यामुळे पिके जळू लागली आहेत. तसेच कापसाची फक्त एकच वेचणी झाली आहे. त्यामुळे खरिप व रबी हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे शासनाने या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ मदत जाहिर करावी व जनावाºयांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवावा.
- विक्रम टेकडे, शेतकरी, अंदापूरी
चारा छावण्या उभारा
- गतवर्षी १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारीचा पेरा झाला होता. तर हरभरा १ लाख २४ हजार ५२३ हेक्टर व गहू ४४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.
- यावर्षी रब्बी ज्वारीची पेरणी ५ हजार ६३९ हेक्टर, तर हरभरा फक्त ६०९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
- त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरीत संपूर्ण दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, जनावरांच्या चारा व पाण्यासाठी छावण्या उभारण्याची मागणी शेतकºयांसह, विविध पक्ष व संघटनांकडून होत आहे.