कोरोना काळात बंद झालेल्या नेत्र शस्त्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:30 AM2021-02-14T04:30:57+5:302021-02-14T04:30:57+5:30
लॉकडाऊनमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया गेल्या नऊ महिन्यापासून बंद झाल्या होत्या. त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे मोठे हाल झाले. आता ...
लॉकडाऊनमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया गेल्या नऊ महिन्यापासून बंद झाल्या होत्या. त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे मोठे हाल झाले. आता तीन महिन्यांत नियम बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना काळात येथील उपजिल्हा रुग्णालय बंद झालेल्या नेत्र शस्त्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. यात डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यांत साठ नेत्र शस्त्रक्रिया झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दर सोमवार, बुधवार तसेच शुक्रवार रोजी बाह्यरुग्ण विभागात डोळ्याची तपासणी करण्यात येते. तसेच आठ दिवसाला दर शुक्रवारी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील तसेच बाहेरील तालुक्यातील रुग्ण तपासणी व नेत्र शस्त्रक्रियेसाठी येतात.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया बंद झाल्या होत्या. मात्र आता डिसेंबर महिन्यापासून या शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून, नागरिकांनी या शस्त्रक्रियाचा लाभ घ्यावा, असे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक डाॅ. जीवन काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तालुक्यातील जातेगाव व मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णाची तपासणी केली जाते. दर महिन्याला दोन्ही गावांतील ४० रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे येथील डाॅ. रंजित सानप यांनी सांगितले.