कुटुंबाच्या मेहनतीने बहरली पेरूची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:57+5:302021-09-05T04:37:57+5:30

कडा : विनाअनुदानित संस्थेवर नोकरी करताना अल्प मानधन त्यातच कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी पार पाडताना व आधुनिक शेती करताना ...

The Peruvian garden flourished with the hard work of the family | कुटुंबाच्या मेहनतीने बहरली पेरूची बाग

कुटुंबाच्या मेहनतीने बहरली पेरूची बाग

Next

कडा : विनाअनुदानित संस्थेवर नोकरी करताना अल्प मानधन त्यातच कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी पार पाडताना व आधुनिक शेती करताना अडचणींचा डोंगर समोर होता; परंतु वडिलांचे स्वप्न आणि मित्राच्या मार्गदर्शनातून घरात पैसा नसताना उसनवारी करून थेट झारखंड येथून पेरूची रोपे आणून लागवड केली. दिवसरात्र मेहनतीच्या जोरावर कुटुंबातील सदस्यांच्या कष्टाने दीड एकरात फुलवलेल्या पेरूच्या बागेने साथ दिली. पेरूची बाग आणि आंतरपिकाने विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याची किमया केली.

आष्टी तालुक्यातील कडा -पैठण -बारामती रोडलगत असलेल्या चोभानिमगांव येथील सचिन वसंतराव गिऱ्हे यांचे शिक्षण बी.एस्सी.बी.एड. झाले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली. विनाअनुदानित संस्था असल्याने अल्प मानधन, घरात आई, वडील, पत्नी, दोन मुले असताना आधुनिक पद्धतीने शेती करताना कुटुंब चालवताना अनंत अडचणी निर्माण व्हायच्या. मेळ लागत नव्हता. मित्राच्या मार्गदर्शनातून फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला, पण पैसा नसल्याने अडचणी होत्या. ‘धाडस करून बघू’ म्हणत उसनवारी करून मित्रांना सोबत घेऊन थेट झारखंड गाठले. तेथून ४०० रोपे जांभूळ, ६०० रोपे सीताफळ, १५७ रोपे केसर अंबा, ११०० रोपे पेरू, १२०० रोपे पपईची खरेदी केली. पाच एकर क्षेत्रांत २०२० मध्ये लागवड केली. ठिबक सिंचनच्या साहाय्याने आंतरपीक म्हणून झेंडू, शेवंती फुलपिके घेतली. झेंडूने मागील वर्षात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवून दिले. यावर्षी पेरू विक्रीला आले असून ७० रुपये किलोचा भाव मिळाला. अडीच टन उत्पादनातून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले. आणखी पन्नास हजार रुपये राहिलेल्या पेरूची मिळतील, असा अंदाच सचिन गिऱ्हे यांनी व्यक्त केला.

बाग लावून फुलविली, फळे बहरली, पण विकण्यासाठी बाजारपेठेची गरज होती. विशेष म्हणजे तालुक्यातच बाजारपेठ उपलब्ध केली असून ऑनलाईन घरपोच विक्री करीत बदलत्या विक्री व्यवस्थेची कास धरली. नोकरी करून वडील वसंतराव, आई आशाबाई, पत्नी आश्विनी, मुले आर्यन व अर्णव, चुलत भाऊ तुषार यांच्या मदतीने फुललेल्या फळबागेने कुटुंबाची आर्थिक घडी चांगली बसवली. बाजारपेठ व नवीन तंत्रज्ञान अवगत करून तरुणांनी शेती करायचे धाडस निर्माण करत कृषी विभागाचे सल्ले घेऊन शेती केल्यास आपली परिस्थिती आपणच बदलू शकतो, यासाठी तरुणांनी आधुनिक पद्धतीची शेती करण्याचा सल्ला सचिन गिऱ्हे यांनी दिला.

Web Title: The Peruvian garden flourished with the hard work of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.