पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:45+5:302021-06-05T04:24:45+5:30
धारूर : पारंपरिक शेती परवडत नसल्याने खोडस येथील एका शेतकऱ्याने पेरुची लागवड करुन रक्ताचं घाम गाळून हाताच्या फोडाप्रमाणे ...
धारूर : पारंपरिक शेती परवडत नसल्याने खोडस येथील एका शेतकऱ्याने पेरुची लागवड करुन रक्ताचं घाम गाळून हाताच्या फोडाप्रमाणे दोन वर्ष ही बाग जपली. मात्र फळ खाण्याच्या वेळीच लॉकडाऊन लागले यामुळे फळे विकता आली नाही. पूर्ण फळे गळून त्याची जागेवरच माती झाली असून जवळपास सव्वा लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. खोडस येथील शेतकऱ्याप्रमाणे अन्य फळ उत्पादकांनाही लॉकडाऊनचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील खोडस येथील अंगद बाबूराव लाखे या तरुणाने पारंपरिक शेती सध्या परवडत नसल्याने फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. अर्ध्या एकरात इस्त्राईल पद्धतीने १० बाय ४ या प्रमाणे पेरुच्या पाचशे रोपांची लागवड केली. सलग दोन वर्ष या बागेची हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली. दोन वर्षांनंतर यावर्षी फळे लगडली होती. फळांनी बहरून गेलेली बाग पाहून मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटत होते. प्रति झाड १० किलो फळे निघाली तर जवळपास पाच टन उत्पादन व त्यातून सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र फळे काढणी आणि विक्रीला येताच शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित केले. तसेच आठवडे बाजारही बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला पेरू कुठे विकता आले नाही तर व्यापाऱ्यांनी देखील खरेदी केला नाही. सर्व पेरु झाडालाच पिकून गळून पडली. दोन वर्षांच्या मेहनतीची डोळ्यासमोर माती होताना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. लागवडीपासून ते आजपर्यंत जवळपास ४० हजार रुपये खर्च आला असून हा खर्च ही पदरमोड करावा लागला. गतवर्षी तसेच यंदाही लॉकडाऊन यामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात असे नुकसान यामुळे फळबाग लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
माझ्या कुटुंबात पूर्ण ११ एकर शेती आहे. यासाठी विहीर असून त्यास मात्र हंगामामध्ये पाणी असते. त्यामुळे ही कोरडवाहू शेती असून वेगळा प्रयोग करण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून बोअर घेतला त्यास पाणी लागले. यावरच पेरू आणि लिंबू बाग लावली याचा पहिला बहार वाया गेला. यामुळे दोन्ही पिकांचे मिळून जवळपास पावणेदोन लाखांचे नुकसान झाले. - अंगद लाखे
शेतकरी, खोडस ता. धारुर
===Photopath===
040621\img-20210604-wa0201_14.jpg