पेट्रोल, डिझेलचा भडका तरी आंदोलने थिजलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:23+5:302021-01-20T04:33:23+5:30

बीड : दर पाच-सहा दिवसांनी दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका होऊन सामान्य जनता होरपळत असताना अशा सामाजिक ...

Petrol and diesel exploded but the agitation froze | पेट्रोल, डिझेलचा भडका तरी आंदोलने थिजलेलीच

पेट्रोल, डिझेलचा भडका तरी आंदोलने थिजलेलीच

Next

बीड : दर पाच-सहा दिवसांनी दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका होऊन सामान्य जनता होरपळत असताना अशा सामाजिक प्रश्नांवर होणारी आंदोलने थिजली की काय? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. दुसरीकडे घोषणांचा पाऊस पाडत जीवनाशी निगडित प्रश्नांबद्दल दिशाभूल करण्याचे प्रयत्न सत्ता भोगणारे करत आहेत.

गॅस, पेट्रोल, डिझेलचा वापर वाढला आहे. लाईफलाईनसाठी या बाबी आवश्यक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार भारतात इंधन दर ठरत असले तरी त्यावर लागणाऱ्या इतर करांमुळे होणारी दरवाढ चटका देत आहे. इंधन दरवाढीच्या विषयावर विविध संघटना आंदोलन करीत होत्या. कधी प्रतीकात्मक, कधी उपहासात्मक, तर कधी आक्रमक आंदाेलनामुळे आपलेही कोणीतरी प्रतिनिधित्व करत असल्याची जनभावना निर्माण व्हायची. मात्र, कालांतराने सामाजिक पातळीवर आंदोलनाचे विषय पक्ष, संघटनांच्या कार्यानुसार बदलत गेले. त्यामुळे घरासाठी लागणारा गॅस, वाहनांसाठी लागणारे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले तरी त्याकडे आंदोलक, पक्ष, संघटना कानाडोळा करत आहेत. काही पक्ष राजकीय पोळी भाजण्यापुरते फोटो सेशन करून आंदोलन करतात. त्यामुळे सामान्य जनताही पाहण्यापलीकडे कुठलाही प्रतिसाद देत नाही. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर की आणि इतर विषयांवर आंदोलने करण्यात राजकीय पक्ष, संघटना रस घेत असल्याने तेलाच्या पाऊला -पाऊलाने महागाईचा भडका सुरूच आहे.

पेट्रोल दर (प्रति लिटर)

जानेवारी २०१७ - ७४.३५

जानेवारी २०१८ - ७८.६७

जानेवारी २०१९ - ७५.३०

जानेवारी २०२० - ८१. ७२

जानेवारी २०१२१ - ९१. ७०

डिझेलचे दर

जानेवारी २०१७ - ६१.८६

जानेवारी २०१८ - ६३.४५

जानेवारी २०१९- ६५.५७

जानेवारी २०२० - ७१.४०

जानेवारी २०२१ - ८०.५८

----------------

कोणतीही परिस्थिती नसताना भारतात इंधन दरवाढ होत आहे. आंदोलने केली तर कोविड- १९ नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले जातात. अनेकदा दबातंत्राचा वापर होतो. त्यामुळे आंदोलनाची धार कमकुवत झाली आहे. सत्ता भोगणाऱ्यांनी सर्वसामान्यांचा विचार करावा.

- ॲड. भीमराव चव्हाण, भाकप, बीड.

---

आता बैलगाडी, घोडे, गाढवांचा वापर करावा लागेल. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. सरकार केवळ घोषणा आणि गप्पा करतंय. या दरवाढीचा शेतकऱ्यांसह सामान्यांवर परिणाम होत असल्याने सक्रिय होत आम्ही आंदोलन करणार आहोत.

- गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती.

---

बारा बलुतेदार व्यवसायात बदल करत आहेत. मात्र, लागणारे इंधन व त्या आधाराचे साहित्य महाग होत असल्याने आर्थिक संकट वाढले आहे. व्यापार, व्यवसायावरही परिणाम होऊन दरवाढीचा मोठा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन दरवाढीवर नियंत्रणाची गरज आहे. वेळ पडल्यास आंदोलन करावे लागणार आहे.

- प्रकाश कानगावकर, जिल्हाध्यक्ष, ओबीसी, बारा बलुतेदार संघटना.

--

पेट्रोल शंभरी गाठत आहे, तर डिझेल महागल्याने जनमानसावर परिणाम झाला आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. गॅस दरवाढीमुळे महिलांची कसरत होत आहे. त्यांचे किचन बजेट बिघडत आहे. गरज नसताना दरवाढ नको. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करण्यासाठी उपाय करावेत.

- ॲड. करुणा टाकसाळ, बीड.

----

पेट्रोल- डिझेल, गॅसच्या दरवाढीचा त्रास सर्वांनाच बसत आहे. गॅसवर मिळणारी सबसिडी बंद केल्यात जमा आहे. इंधन दरवाढीचा लघु उद्योग, व्यवसाय करणाऱ्या महिलावर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गरज असेल तरच सरकारने इंधन दरवाढ अल्प करावी. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये दरवाढ करूच नये.

- विद्या खवले, शिक्षिका, बीड.

दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम

बीड जिल्ह्यात परळी वगळता इतर ठिकाणी ट्रक, बसद्वारे माल आणि प्रवासी वाहतूक होते. डिझेल दरवाढीचा परिणाम वाहतूक दरावर होतो. त्यानंतर त्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर होतो. या दरवाढीमुळे बाजारपेठेतील ग्राहकांवरही कमालीचा परिणाम होत आहे.

Web Title: Petrol and diesel exploded but the agitation froze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.