केरळहून प्रशिक्षण घेऊन बीड, जालन्यात घेतले PFI कॅम्प; एटीएस उलगडतेय फैजलचे नेटवर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:21 PM2022-10-04T12:21:40+5:302022-10-04T12:22:40+5:30
पीएफआयच्या वतीने बीडसह जालना येथे ठराविक व्यक्तींना बंद शेडमध्ये शारीरिक प्रशिक्षण दिल्याचा आरोप
बीड : एनआयए व एटीएसच्या रडारवर असलेल्या पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) औरंगाबादेतील पाच संशयित पदाधिकाऱ्यांपैकी सय्यद फैजल सय्यद खलील (वय २८ ) याचे बीड कनेक्शन समोर आले आहे. पीएफआयच्या वतीने बीडसह जालना येथे ठराविक व्यक्तींना बंद शेडमध्ये शारीरिक प्रशिक्षण दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बीड पुन्हा चर्चेत आले आहे.
देशविरोधी कटकारस्थान रचल्याच्या संशयावरून एनआयए, एटीएसने २२ सप्टेंबर रोजी पहाटे देशभर छापे टाकले होते. यात नाशिक येथील दहशतवादविरोधी पथकाने पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख (३०, रा. जुनाबाजार, बीड) यास उचलले होते. इकडे औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादेतून चार व जालना येथून एक अशा पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. २ ऑक्टोबर रोजी या पाच संशयितांच्या कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.
यापैकी औरंगाबादेतील रोजेबाग परिसरातील रहिवासी सय्यद फैजल सय्यद खलील याने केरळमधून प्रशिक्षण घेतलेले असून पीएफआयतर्फे तो बीड व जालना येथे बंद शेडमध्ये मोजक्या व्यक्तींना प्रशिक्षण देत असल्याने एटीएस पथकाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे बीड पुन्हा एकदा एनआयए व एटीएसच्या नजरेत आले आहे. फैजलने किती जणांना प्रशिक्षण दिले, प्रशिक्षण कशा प्रकारचे होेते, या बाबी चौकशीतच उघड होणार आहेत.
एटीएसने मागवला बॅंक खात्यांचा तपशील
पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख याच्या बँक खात्यांचा तपशील मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसीम शेख सध्या नाशिक एटीएसच्या ताब्यात असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या बँक खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.
दोन पदाधिकाऱ्यांची जामिनावर सुटका
२७ सप्टेंबर रोजी पहाटे पीएफआय जिल्हाध्यक्ष फेरोज मोमीन (३६, रा. कागदीवेस, बीड) व जिल्हा कार्यकारिणी सदस्य कामरान खान मोहब्बत खान (३५,रा. जुना बाजार, बीड) या दोघांना स्थानिक पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. कलम १५१ (३) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा कारागृहातून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत त्यांच्यावर कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
काहीजणांवर नजर आहे
पीएफआयसंबंधी एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यांना तपासकामी आवश्यक ते सहकार्य करण्याचे काम जिल्हा पोलीस दल करत आहे. दोन पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर पोलीस वॉच ठेवून आहेत.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड