चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:05 PM2022-12-09T19:05:55+5:302022-12-09T19:06:17+5:30
ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून माजीमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व
- संजय खाकरे
परळी ( बीड) : तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे उमेदवार अभय माणिकराव मुंडे हे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मुंडे बंधू -भगिनीचा फोटो एकाच बॅनरवर झळकला असून सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल झाला आहे.
नाथरा हे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे गाव आहे. सध्या गावात माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सक्रीय राजकारणात आहेत. यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीस विशेष महत्व आहे. नाथऱ्यातील प्रभाग क्रमांक एक, व तीन या दोन प्रभागातील अनुक्रमे तीन, तीन सदस्य, वॉर्ड क्रमांक 2 मधील 2 सदस्य असे मिळून 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांचेही समर्थक असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. यात मुंडे बहिण भावांचे चुलत भाऊ अभय मुंडे यांचा देखील समावेश आहे. तर प्रभाग 2 मधील एका जागेसाठी गीता प्रकाश मुंडे व दिव्या अंगद मुंडे या उभ्या आहेत. या दोन्ही जागेसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नाथऱ्यात माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. दोघांचे समर्थक अभय मुंडे यांच्यासाठी एकत्र येत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून धनंजय मुंडे यांचे वर्चस्व
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आली होती,तेव्हा बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी अजय मुंडे हे सरपंच झाले होते. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे ते चुलत बंधू आहेत. मागील दोन टर्मपासून नाथरा ग्रामपंचायत राष्ट्वादीचे आ. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे.