पीआय खाडेंमुळे साईड पोस्ट बनली क्रीम पोस्ट; आर्थिक गुन्हे शाखेचा नवा कारभारी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:42 PM2024-05-22T15:42:21+5:302024-05-22T15:42:36+5:30
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले.
बीड : आर्थिक गुन्हे शाखेची पोलिस निरीक्षक ही पोस्ट साईड पोस्ट समजली जाते. हा अलिखित नियमच आहे. परंतू पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने ही पोस्ट साईड नसून क्रीम असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. खाडेचे निलंबन झाल्याने ही जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागले आहे.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटी रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार आर.बी.जाधवर आणि खासगी इसम कुशल जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले. यासोबतच जाधवरच्या घरातही पावकिलो सोने सापडले होते. अद्यापही हे दोघे फरारच आहेत. दरम्यान, कारवाई नंतर लगेच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी खाडे आणि जाधवरचे निलंबण केले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेची जागा रिकामी झाली आहे. या जागी आता नवा अधिकारी कोण येणार? याकडे लक्ष लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, याच शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी या शाखेसाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला तक्रारी नसलेले सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्या नावाचीही चर्चा आहे. गात यांच्याकडे अनुभव असल्याने आणि प्रतिमा स्वच्छ असल्याने त्यांच्याकडे पदभार देण्याची मागणी ठेविदारांकडून केली जात आहे. परंतू पोलिस अधीक्षक ठेविदारांच्या मागणीचा विचार करतात की दुर्लक्ष, हे वेळच ठरवेल.
ठेविदारांचा एसपींवरही आरोप
खाडेवर कारवाई झाल्यानंतर जिजाऊच्या ठेविदारांनी खाडेवर तर आरोप केलेच, परंतू त्याला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचेच पाठबळ असल्याचा आरोपही केला होता. तसेच या प्रकरणाची फेर चौकशी करण्याची मागणीही केली होती. आतापर्यंत तरी ठेविदारांवर आर्थिक गुन्हे शाखेने न्याय दिलेला नाही. आता तरी चांगला अधिकारी देऊन न्याय देतील का? याकडे लक्ष लागले आहे.
पोलिस अधीक्षक बैठकीत
आर्थिक गुन्हे शाखेच्या पदभाराबात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना संपर्क केला. परंतू त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे फारसे बाेलता आले नाही. तर अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनीही फोन घेतला नाही. त्यामुळे बाजू समजली नाही.