व्यापाऱ्यांचा पिकअप बुडाला अन् ओढ्याला नोटांचा पूर; दोघे बचावले, एक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:53 PM2022-10-14T19:53:17+5:302022-10-14T19:56:22+5:30
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे.
दिंद्रुड (बीड): सिरसाळा - मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. रईस अन्सर आत्तार असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. दोघे व्यापारी असून फटाके माल आणण्यासाठी पिकअप घेऊन निघाल्याची माहिती आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे. दरम्यान, आज दुपारी शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार, व दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून पिकअपमधून अंबाजोगाईकडे निघाले. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पुर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पिकअप ओढ्यात बुडाला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने गाडीसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले.
गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल आत्तार व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र शेख रईस अन्सर अत्तार ( 35 वर्ष) अद्याप बेपत्ता आहे. पडता पाऊस व पुरामुळे शोध कार्यास अडथळा येत आहे. ओढा घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील मुंगी-सुकळी तलावास मिळतो. तेथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोधकार्य केले असताही तरूण सापडला नाही. दरम्यान, उद्या सकाळी परळी येथील फायर ब्रिगेडचे पथक शोधकार्य करेल अशी माहिती, धारूरचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिली आहे.
ओढ्यात नोटांचा खच
शेख अखिल अत्तार आणि शेख रईस अन्सर अत्तार हे नातेवाईक आहेत. ते दोघे व्यापारी असून फटाक्यांचा माल भरण्यासाठी दीपक चोरघडेचे पिकअप घेऊन अंबाजोगाईकडे निघाले होते. गाडीसह तिघेही बुडत काही अंतरावर वाहत गेले. या व्यापाऱ्यांकडे फटाके खरेदीसाठीची मोठी रक्कम होती. ती ओढ्यात सर्वत्र पसरली होती. ओढ्याच्या जवळच असलेल्या मुंगी-सुकळी तलावात देखील नोटांचा खच पाहण्यास मिळाला.