बेजबाबदारपणाचा कळस; लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच इमारतीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:38+5:302021-04-01T04:33:38+5:30
बीड : कोरोना लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरू आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयात लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच छताखाली होत ...
बीड : कोरोना लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरू आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयात लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच छताखाली होत असल्याचे समोर आले आहे. जागेचा प्रश्न असला तरी येथे कोरोना नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोना लस दिली आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात बुधवारी नियोजनाचा थोडा अभाव असल्याचे दिसले. लसीकरण आणि चाचण्या एकाच इमारतीच्या परिसरात होत आहेत. हा सर्व परिसर हाय रिस्क आहे. कारण लसीकरण स्थळापासून हाकेच्या अंतरावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण आणि चाचण्या करणाऱ्यांचा संपर्क होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. जयश्री बांगर यांना हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आला.
एकच छत असल्याने संसर्गाची भीती
जिल्हा रुग्णालयात दोन इमारती आहेत. कोरोना रुग्णांसाठी असलेल्या इमारतीच्या समोरच कोरोना चाचणी केली जाते. तसेच येथेच मदत केंद्रही आहे. तर दुसऱ्या इमारतीत कोरोना लसीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे बुधवारी तर याच इमारतीत ओपीडी पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. यामुळे ज्येष्ठांना येथून संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आला.
ज्येष्ठांना अधिक भीती
६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि को-मॉर्बिडिटीज आजार असलेल्यांना सध्या कोरोना लस दिली जात आहे. ही लस ज्या ठिकाणी दिली जाते, त्याच ठिकाणी कोरोना चाचणी करण्यासाठी आवश्यक पावती घेण्यासाठी लोक रांगा लावत असल्याचे बुधवारी दिसले.
नियोजन गरजेचे
कोरोना पॉझिटिव्ह, संशयित आणि निगेटिव्ह लोकांचे अहवाल घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. या सर्वांना वेगवेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचीही गरज आहे.
===Photopath===
310321\312_bed_6_31032021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात ज्या ठिकाणी ज्येष्ठांना कोरोनाची लस दिली जाते, त्याच्या बाजुलाच कोरोना चाचणी करणाऱ्या लोकांना ओपीडी पेपर दिला जात होता. यातीलच काही लोक पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील ज्येष्ठांना याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आला.