जनावरांचे वैरण नेत्यांनी खावू नये असे छावणीचे नियोजन करणार : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:41 PM2019-02-06T17:41:45+5:302019-02-06T17:42:26+5:30
छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु
बीड : दुष्काळजन्य स्थितीमध्ये जनावरं जगली पाहिजे त्यामुळे मागणीप्रमाणे चारा छावणी व्यवस्थेत बदल केला जाईल. परंतु छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु, योग्य ठिंकाणी पाहिजे त्या प्रमाणात छावणी सुरु करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बीड येथे नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्याचा भाग दुष्काळाने होरपळला आहे. एक वर्ष सोडले तर सातत्याने समाना करावा लागतोय. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरली. आतापर्यंत दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मर्च- एप्रिलमध्ये यायचे, दुष्काळाचे अनुदान मे- जूनमध्ये मिळायचे. यंदा दुष्काळाची तीव्रता पाहून आम्ही ३१ आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. ६०० कोटींचे अुनदान दिले. त्यापैकी १५६ कोटी वर्ग केले. ही रक्कम प्रशासनाच्या खात्यात अथवा बॅँकेत ठेवू नका, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिल्याचे सांगून येत्या १५ मार्चपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
बेघरांना घर देण्यास सरकार कटीबद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारनेही आतापर्यंत ५ लाख घरे पूर्ण केली, ५ लाख घरे करत आहोत. हे काम कधीच झाले नाही. सरकार बेघरांना घरे देण्यासाठी कटीबध्द असून बीडमध्ये जेवढ्या घरांची मागणी असेल ती मंजूर करु अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिक्रमणे नियमित करत असून ३ लाख अतिक्रमणे नियमित केल्याचे सांगून १० लाख अतिक्रमणे नियमित करण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पहा व्हिडिओ :