झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 04:45 PM2020-02-15T16:45:17+5:302020-02-15T16:45:33+5:30
प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा
- प्रभात बुडूख
बीड : पर्यावरण संवर्धनसाठी गावागावात अराजकीय संघटनेची गरज असल्याचे मत सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी दुपारच्या सत्रात आ.रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी ‘वृक्ष संवर्धन आणि महिलांचा सहभाग यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा, असे आवाहन त्यांनी केले.
त्या म्हणाल्या, महिला या संवेदनशिल असतात. आजपर्यंत एकातरी शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याचे ऐकिवात आहे का ? कारण तिला मातृत्वाची जाणीव असते. त्यामुळे आईप्रमाणे आपण सर्वांनी जिथे जागा मिळेल त्याठिकाणी झाडे लावावीत आणि मुलांप्रमाणे त्याचे संगोपन करून ती वाढवावीत. तरच झाडांची संख्या वाढेल. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास टाळता येईल आण् िभविष्यातील धोके कमी होणार आहेत. आजचा भारत आपला असला तरी उद्याचा भारत मात्र, या नव्या पिढीचा आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे धडे व ज्ञान त्यांना गरजेचे आहे, असे पवार म्हणाल्या.
महिलांनो सक्षम व्हा
बारामती तालुक्यात शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती तसेच ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण व बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आमची संस्था काम करते. अशाच प्रकारे बीड, कर्जत-जामखेड व इतर ठिकाणी देखील करण्याची आमची तयारी असल्याचे पवार म्हणाल्या.
गर्भाशय काढू नका
महिलाचे गर्भाशय म्हणजे तिचे आयुष्य आहे. मुलांना जन्म देण्यासाठी आवश्यक असलेले गर्भाशय हे स्त्रीसाठी महत्त्वाचे आहे. बीडमध्ये प्रामुख्याने उसतोड मजुर महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण अधिक आहे. ते कृपया काढू नये. मासिक पाळीमध्ये महिलांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. भेदभाव न करता मुलांना जन्म द्या असे आवाहन पवार यांनी केले.