आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भावनांशी खेळ; समुपदेशनाच्या नावाखाली १२ लाखांची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:22+5:302021-08-13T04:38:22+5:30
सोमनाथ खताळ बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रकल्प प्रेरणा विभागाला पूर्ण अपयश आलेले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ ...
सोमनाथ खताळ
बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रकल्प प्रेरणा विभागाला पूर्ण अपयश आलेले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ ५३ शेतकरी कुटुंबांनाच भेट दिली आहे, तसेच कुटुंब व गावभेटीचे कारण सांगत तब्बल १३ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी या विभागाने केली आहे. यानिमित्ताने प्रकल्प प्रेरणा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी आत्महत्या थांबविण्याच्या उद्देशाने शासनाने पाच वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग स्थापन केला. एका मानसोपचारतज्ज्ञासह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या विभागाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम घेणे अपेक्षित असते; परंतु हा विभाग भेटीच्या नावाखाली पर्यटन दौरा करत बसला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबल्याच नसल्याचे दिसते. येथील अधिकारी, कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून केवळ लाखो रुपये निधीची उधळपट्टी करत असल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
---
८३ गावांसाठी १२ लाखांचा खर्च
या विभागाने तीन वर्षांत ३८८ पैकी केवळ ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेट दिली आहे, तसेच ३० गावांत समुपदेशन केले. या ८३ गावांत जाण्यासाठी १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरून यात मोठा घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
---
वेतनावर पावणेदोन लाख खर्च
या विभागात काम करणाऱ्यांना प्रतिमहिन्याला १ लाख ७५ हजार रुपये वेतनावर खर्च केला जात आहे. एवढा खर्च होऊनही शेतकरी आत्महत्या रोखण्याऐवजी त्यांच्याकडून भेटीच्या नावाखाली पर्यटन दौरे केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
--
८ महिन्यांपासून विभाग बंदच
प्रकल्प प्रेरणा या विभागात मागील ८ महिन्यांपासून एकही कर्मचारी कार्यरत नाही. येथील सर्वच लोक मानसिक आरोग्य केंद्रात भरती झालेले आहेत. या विभागातही त्यांचे पहिले पाढे पढ पंचावन्न अशीच स्थिती आहे. कायम कामचुकारपणा करण्यासह शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही कार्यमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
---
प्रकल्प प्रेरणा विभागातील आकडेवारीची माझ्याकडे अपडेट नाही. मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल. मग सांगतो.
-डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, बीड