मराठवाड्याचे नाटक काल आणि आजही सशक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:22 PM2017-12-25T23:22:54+5:302017-12-25T23:23:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : मराठवाड्याच्या नाटकांचा विचार केला असता येथे मोठी समृद्ध परंपरा आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : मराठवाड्याच्या नाटकांचा विचार केला असता येथे मोठी समृद्ध परंपरा आहे. संहिता विषयांच्या बाबतीत मराठवाड्यातील नाटक काल आणि आज खूप सशक्त आहे. परंतु, आर्थिक पाठबळ नसणे व नाट्यगृहांच्या दुरवस्थेने नाट्यपरंपरेला खिंडार पडत असल्याची चिंता चौथ्या परिसंवादात व्यक्त झाली.
सर्वज्ञ दासोपंत सभागृहात केशव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठवाड्याचं नाटक : काल आणि आज’ या विषयावरील परिसंवादात रविकुमार झिंगरे, स्वाती देशपांडे, डॉ. सतीश साळुंके यांनी सहभाग घेतला.
नाटक केवळ साहित्याचाच एक प्रकार संहितेसह संपत नाही. सादरीकरण महत्त्वाचे आहे. मराठवाड्यात सुविधा नसल्याने नुकसान होतेय. बहुतांश नाट्यगृहांची अवस्था उकिरडा म्हणावे लागेल, अशी मांडणी वक्त्यांनी केली.
रविकुमार झिंगारे म्हणाले, बालनाट्याची मोठी परंपरा मराठवाड्याला लाभलेली आहे. परंतु, आता शालेय स्तरावर बालनाट्य मागे पडत आहे. स्पर्धेअभावी मुलांना व्यासपीठ मिळत नाहीये. स्पर्धा झाल्यास कलाकार घडून त्यांना संधी मिळेल. मराठवाड्यातील कलावंतांना मुंबई-पुण्याचे वेध लागलेले असतात. ते येथे रुजू पाहत नाही. त्यामुळे एक सातत्यपूर्ण प्रयत्न होत नाही. सुविधांचा अभाव हे ही कारण आहे. तांत्रिक बाजूंमध्ये आपण मागे पडतो.
मराठवाड्यातील नाटकांची समीक्षाच होत नाही, असे मुद्दे समोर आले. मराठवाड्यातील रसिक प्रगल्भ आहेत. त्यांना नवनवीन विषय हवेत. सगळ्या सुविधा मिळाल्यास मराठवाड्यातून माणसाच्या अंतरंगाला हात घालणारे एकाहून एक सरस नाटके बाहेर पडतील, असा विश्वास झिंगरे यांनी दिला. सूत्रसंचालन अमृत महाजन यांनी केले. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आभार मानले.