रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 06:32 PM2024-12-09T18:32:03+5:302024-12-09T18:32:46+5:30
कंपन्यांना अभय कोणाचे? आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) : येथील स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयात वर्षभरापेक्षा जास्त काळात जवळपास २५ हजार ९०० गोळ्या रुग्णांना वितरित झाल्या असून राज्यभरात चार कंपन्यांकडून तब्बल ८५ लाख बनावट गाेळ्यांचे वाटप झाले आहे. हा प्रकार औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर चव्हाट्यावर आला. आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत. याचवेळी बनावट औषधी देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांना काेणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयात दररोज किमान १६०० ते १८०० रुग्ण उपचारासाठी येतात. याच रुग्णालयात बनावट औषधी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याची खोलवर जाऊन चौकशी केली असता राज्यभरात लाखो गोळ्यांचे वाटप झाल्याचे उघड झाल्याचे समोर आले आहे. सर्दी, खोकला, घसा दुखणे, दम लागणे या आजारासाठी ॲझिमॅसिन -५०० ही बनावट गोळी रुग्णांना उपचारासाठी दिली जात असे. गेल्या एक वर्षापासून ही औषध वाटपाची प्रक्रिया सुरूच राहिली. हजारो रुग्णांनी या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगण्यात आले. आता याच प्रकरणात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून बनावट औषधांच्या कंपन्या व ते पुरविणारी कंत्राटदार कोण, याची चौकशी पोलिस करत आहेत.
आंतरराज्य टोळी सक्रिय?
रुग्णालयात बनावट औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य पातळीवर असण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने वर्तविली जात आहे. अंबाजोगाईत भांडारातील तपासणीसाठी घेण्यात आलेल्या औषधांमध्ये बनावट औषधे असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अंबाजोगाईतून नेमक्या कोणत्या ई-निविदेद्वारे हे औषधी मागवण्यात आली होती, या औषधांची निर्मिती कोठे झाली, त्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग मटेरियल हे साहित्य कोठून आणले, अशा औषधांची कुठे कुठे विक्री तसेच पुरवठा झालेला आहे, याचाही तपास सुरू आहे. या टोळीने आणखी कोणती बनावट औषधी रुग्णालयात पुरविली का, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
बनावट औषधांच्या चौकशीची मागणी :
परराज्यातून अनेक औषधी कंपन्या येथील शासकीय रुग्णालयास औषध पुरवठा करतात. या बनावट औषधांचा पुरवठा कसा व कुठून झाला. यात भांडारातील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध आहेत का, येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे का, याची सखोल चौकशी करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध कार्यवाही करावी.
- अमर देशमुख, तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी (शरद पवार गट) अंबाजोगाई
या गोळ्यांचा साईड इफेक्ट नाही :
स्वा. रा. ती. रुग्णालयातून वाटप करण्यात आलेल्या ॲझिमॅसिन -५०० या गोळ्यांचा रुग्णांवर कसलाही साइड इफेक्ट झालेला नाही. या गोळ्या पुरवठा करणाऱ्या कंपनीचे बिलही थांबविले आहे. हा पुरवठाही बंद आहे.
- डॉ. जुगलकिशोर जाजू, औषधभांडार प्रमुख, स्वा. रा. ती. रुग्णालय, अंबाजोगाई.
या कंपन्यांकडून झाला पुरवठा
मे. विशाल इन्टरप्रायजेस प्रा. लि. कोल्हापूर - २३ लाख ३० हजार १०० (गोळ्या)
मे फार्मासिस्ट बायोटेक, सुरत - १० लाख ९६ हजार ८०० (गोळ्या)
मे. ॲक्वेटिस बायोटेक, भिवंडी - ५० लाख ५५ हजार (गोळ्या)