सावडलेली राख सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:27+5:302021-04-14T04:30:27+5:30
ग्राउंड रिपोर्ट पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी ...
ग्राउंड रिपोर्ट
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी व दशक्रिया विधीसाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडील भागात राख सोडणे बंधनकारक करून दररोज विनापावती वरकमाई करण्याच्या नादात येथील ग्रामपंचायत येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना मात्र प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे.
या ठिकाणी वर्षानुवर्षापासून मृत व्यक्तीच्या विधीसाठी येणारे नागरिक हे दोन्ही नद्यांच्या पात्रात सावडलेली राख सोडत असत. परंतु मागील ५-६ वर्षात येथे येणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विविध फंडे अवलंबिले जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात ग्रामपंचायतीच्या संगनमताने गोदावरी नदी पात्रात झिरा खोदून तेथील पाणी दहा रूपयांना एक हंडा याप्रमाणे विकण्यात आला. यातून मोठ्या प्रमाणात कमाई करण्यात आली.
अलिकडचे प्रदूषण टाळण्यासाठी पलिकडचे फर्मान
मागील सहा महिन्यांपासून येथील गोदावरी पात्र दुथडी भरलेले आहे. याचा फायदा घेत येथील ग्रामपंचायतीने राखेमुळे नदीपात्रात घाण होऊ नये, असे कारण पुढे करत नदीपात्राच्या पलिकडे राख सोडण्याचे अघाेषित फर्मान काढले. या नदीपात्रात मोठे थर्माकोल आणून राख सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसविले जाते. दोरीला ओढत गोदावरीच्या पलिकडील बाजूला सोडून परत आणले जाते. यासाठी मनमानी रक्कम नागरिकांकडून उकळली जात आहे.
गोरखधंद्यातील कमाई कोणाची?
दुखात असलेल्या नागरिकांना लुटण्याच्या गोरखधंद्यातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. यापूर्वी एक हंड्याला दहा रूपये व आता गोदावरी नदीच्या पलीकडे जाऊन येण्यासाठी १५० ते २०० रूपये वसूल केले जातात. याची कोणालाही पावती दिली जात नाही. ही सर्व रक्कम कोणाच्या घशात जाते याची चौकशी होणे जरूरी आहे.
अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?
नदीपात्र पलिकडे असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अलिकडे येण्यासाठी व जाण्यासाठी याच चप्पूचा वापर करावा लागत असून यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. चप्पूवर लहान मुले , वृद्धांना घेऊन ५-६ लोकांना बसवून नेले जाते, येथील नागरिक भीतभीत सांगत होते. जर एखादे वेळी हा चप्पू पलटी होऊन मोठा अनर्थ झाला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विधीला येणाऱ्या नागरिकांना पडत असतो.
जलप्रदूषण टाळण्यासाठी सूचना
गोदावरी पात्रात तिसऱ्या दिवशी राख सोडण्यासाठी येणारे भाविक अलीकडेच राख सोडत असल्याने पाणी घाण होते म्हणून आम्ही राख गोदावरी पात्र पलिकडे सोडण्यास सांगतो. संतोष वाघमारे ,उपसरपंच ग्रामपंचायत मंजरथ.
===Photopath===
130421\13bed_2_13042021_14.jpg