सुखद! परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 08:52 PM2023-01-28T20:52:17+5:302023-01-28T20:53:07+5:30
रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे.
परळी ( बीड) : दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज सायंकाळी विद्युतीकरणाची अंतर्गत तपासणी करून परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली.
परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी आज करण्यात आली.
प्रथमच विजेचे इंजिन
प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विजेचे इंजिन चालवले जाईल. विजेच्या तारा तांब्याच्या असल्याने चोरी होण्याची शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवला जाताे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी
डिझेल इंजिन व विद्युत इंजिनाची प्रत्यक्ष चाचणी व तपासणी करण्यात आली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तांत्रिक विभागाचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी कंट्रोल रूम सबस्टेशनचे अधिकारी आदी उपस्थित होते.