ढेरपोटे पोलीस वाढले, अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:54+5:302021-09-09T04:40:54+5:30
बीड : कामाच्या अनिश्चित वेळा, बंदोबस्त, तपास आणि वाढता ताण यामुळे पोलिसांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून आरोग्याच्या समस्या ...
बीड : कामाच्या अनिश्चित वेळा, बंदोबस्त, तपास आणि वाढता ताण यामुळे पोलिसांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ढेरीचा वाढता घेर अनेक नव्या आजारांना निमंत्रण देतो. परिणामी पोलिसांची कसरत होत असून आरोग्य कसे राखायचे, हा प्रश्नच आहे.
कायदा-सुव्यवस्थेसोबतच गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त आदी कामे पोलिसांना विनातक्रार पार पाडावी लागतात. अपुरे मनुष्यबळ, शहरे आणि गावांचा वेगाने होणारा विस्तार, गुन्ह्यांचा उंचावत जाणारा आलेख यामुळे पोलिसांवरील कामाचा भार वाढलेला आहे. तासन्-तास कर्तव्य निभावताना जेवणाच्या वेळा पाळणे देखील कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत मधुमेह, रक्तदाब असे आजार जडतात. वयाच्या तिशीनंतर पोलिसांना 'फीट' असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत फिनिक्स, दीप व लोटस या खासगी हॉस्पिटल्ससह सर्व सरकारी दवाखान्यांत आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र
घेता येऊ शकते.
....
हजारापेक्षा कमी अर्ज
जिल्ह्यात हजारापेक्षा कमी अधिकारी व अंमलदारांनी 'फीट' असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले. असे प्रमाणपत्र सादर केल्यास शारीरिक प्रोत्साहन भत्ता म्हणून वर्षाकाठी अडीचशे रुपये दिले जातात.
...
जेवणालाही वेळ मिळत नाही...
- कोरोनामुळे बंदोबस्त करण्यात भरपूर कालावधी गेला. त्यात नियिमत कामकाज व तपासाची कामे करावी लागतात. अनेकदा या कामाच्या व्यापात जेवणालाही वेळ मिळत नाही. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो व कुटुंबालाही पुरेसा वेळ देता येत नाही.
- एक अंमलदार
- नियमित कामेच इतकी असतात की उसंत घ्यायला वेळ मिळत नाही. त्यात बंदोबस्त, गस्तीची ड्युटी लागली की तपासकामाला वेळ देणे शक्य होत नाही. यातून मोठी कसरत होते. घर सोडताना पुन्हा घरी कधी परतणे होईल, याची शाश्वती नसते.
- एक अंमदार
....
आठ तासच ड्युटी द्या...
घरदार सोडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना इतर विभागांप्रमाणे कामाच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली. ड्युटीची वेळ आठ तासांची केल्यास पोलिसांचे काम हलके होईल, असे त्यांनी सांगितले.
....
कोरोनामुळे पोलिसांवर कामाचा बोजा वाढला.
मात्र, पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतून पोलिसांसह कुटुंबीयांना कॅशलेस उपचार दिले जातात. कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून ते फीट कसे राहतील, या दृष्टीने प्रोत्साहन दिले जात आहे.- आर. राजा. पोलीस अधीक्षक, बीड