ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:34+5:302021-04-15T04:31:34+5:30
जीर्ण तारा, खांबामुळे धोका अंबेजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या ...
जीर्ण तारा, खांबामुळे धोका
अंबेजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत, तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत आणि शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तांपडे यांनी केली आहे.
सूचनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष
सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल, तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसत असून, संसर्ग वाढत चालला आहे.
नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी होत आहे.
मोबाइलच्या चोऱ्या वाढल्या
बीड : शहरातील बाजार परिसरात व गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाइल, रोख रक्कम लांबवित असल्याने नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. या भुरट्या चोरांचा व मोबाइल पळविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे, परंतु अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.