ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:06+5:302021-05-16T04:33:06+5:30
वाकलेल्या खांबामुळे धोका अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहती अनेक ठिकाणी विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत. विद्युत ...
वाकलेल्या खांबामुळे धोका
अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहती अनेक ठिकाणी विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत. विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकाळत आहेत. या लोंबकाळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकाळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत. शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा.दि.ना.मुडेगावकर यांनी केली आहे.
वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त
अंबेजोगाई : शहर व परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर भर दुपारी उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे सकाळच्या प्रहरीच कामे आटोपण्याकडे शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा राहत आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली
अंबेजोगाई : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी अंबेजोगाई तालुक्यात कोरोनाचे शंभर रुग्ण निघाले, तर शनिवारी पुन्हा १४५ रुग्ण निघाले. तालुक्यात आजपर्यंत ११ हजारांहून जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
अंबेजोगाई : तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत, तर ग्रामीण भागातही ग्रामीण पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून, ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.