चौसाळा येथील स्वच्छतागृहाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:28+5:302021-01-23T04:34:28+5:30
नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी ...
नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर
बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीदेखील वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीजचोरी वाढली
बीड : तालुक्यातील पिंपळनेर, नाथापूर परिसरात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
जैविक कचरा रस्त्यावर
वडवणी : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामध्ये सलाईनच्या बाटल्या, मुदतबाह्य औषधी, गोळ्यांची पाकिटे यांचा समावेश आहे. या जैविक कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याकडे न. पं. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्डे वाढले
केज : तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील गावांमध्ये खड्डे वाढले आहेत. या रस्त्यावरून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. तसेच पैसा आणि वेळ खर्ची पडत आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी सोमनाथ जाधव यांनी केली आहे.
पांदण रस्ता करावा
बीड : तालुक्यातील बोरखेड येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणेदेखील शक्य होत नाही. त्यामुळे वेळोवेळी रस्ता करण्याची मागणी करूनदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पथदिवे बंद
बीड : शहरातील अंबिका चौक ते पांगरी रोड परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहन, तसेच नागरिक दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. यामुळे या भागातील पथदिवे दररोज सुरू ठेवावेत, जेणे करून गैरसोय टळेल अशी मागणी होत आहे.
गाजर गवताचा वेढा
पाटोदा : शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
मोकाट जनावरे वाढली
केज : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढली आहे. रस्त्यांवर बसलेल्या जनावरांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी रहिवाशांमधून होत आहे.